Bad Roads in Manori-Gorai: मुंबई : मुंबईच्या (Mumbai News) पश्चिम उपनगरातील मालाड मनोरी येथील रस्त्यांकडे सध्या मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनाचं पूर्णत: दुर्लक्ष झाल्यानं इथल्या नागरीकांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय. इथल्या रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे इथं चालणाऱ्या मीरा-भाईंदर पालिकेच्या (Mira Bhayandar Municipality) बसगाड्या चालवणं कठीण होऊन बसलंय. बसचं चाक रूतून बसण्याच्या घटना गेल्या आठवड्यात दोनदा घडल्या आहेत. त्यामुळे बससेवा देणाऱ्या कंपनीनं मीरा-भाईंदर पालिकेकडे मुंबई पालिकेची तक्रार केली आहे. तसेच, ही परिस्थिती सुधारली नाहीतर, बससेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात बससेवा देणाऱ्या कंपनीनं एक पत्र लिहिलं आहे.


दरम्यान, या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेनं कोणतीही सूचना देणारे फलकही लावलेले नाहीत. त्यामुळे आता रहिवाशांनीच पुढाकार घेत वाहनचालकांना सूचना देणारे फलक लावण्यास सुरूवात केल्याची माहिती गोराई वेलफेअर संघटनेच्या अध्यक्ष स्वीट्सी हेनरीक्स यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.


प्रकरण नेमकं काय? 


मालाड येथील मनोरी गाव हे मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर असूनही मुलभूत सोयी सुविधांपासून अद्याप लांब राहिलं आहे. या बेटावर उत्तनपर्यंतच्या भागात सेवा देण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची आहे. मात्र, मनोरीत गेल्या अनेक वर्षांपासून मुलभूत सोयीसुविधा पोहोचलेल्याच नाहीत. या ठिकाणी असलेल्या रस्त्यांची तर सध्या भीषण दूरवस्था झालेली आहे. महापालिकेनं या ठिकाणी रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचं काम हाती घेतलेलं असलं तरी पावसाळ्यात अर्धवट काम करून ते थांबवण्यात आलं आहे. ज्याचा फटका इथल्या नागरिकांना आणि वाहनचालकांना बसतो आहे. रस्त्याच्या एका बाजूचंच काम झालं असून अर्धा रस्ता मातीचा आणि चिखलाचा झाल्यामुळे वाहनचालकांना खड्यांचा अंदाज येत नाही. त्यातच अर्ध्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचू लागल्यानं गाडी चालवणं अशक्य होऊन बसलं आहे. 


भाईंदरमधील उत्तन नाका ते मनोरी तलावापर्यंत मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन विभागाच्या बगगाड्या येत असतात. मात्र, मनोरीतील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे बसगाड्या रस्त्यात मध्येच अडकून पडण्याच्या घटना गेल्या आठवड्यात दोनदा घडल्या आहेत. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे बसचे ब्रेक नीट लागत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे, असं पत्र मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी बससेवा देणाऱ्या महालक्ष्मी सिटीबस ऑपरेटरनं महानगरपालिका प्रशासनाला दिलं आहे. तसेच, मुंबई महानगरपालिका प्रशासनाला याबाबत सूचना देत हा रस्ता तातडीनं दुरुस्त करावा, अन्यथा या मार्गावरील बससेवा बंद करावी लागेल, असाही थेट इशारा यापत्रातून देणात आला आहे.