मुंबई : राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी करावी, असं खुलं आव्हान शिवसेनेने दिलं आहे.
उद्धव ठाकरे कुटुंबाची सात बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्यांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतील कालच्या सभेत उद्धव ठाकरे त्यांची संपत्ती जाहीर करणार का असा सवाल विचारला होता.
याबाबत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपचे आरोप फेटाळले.
‘साहेब संपत्ती घोषित करणार का?’, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल
"उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाकडे कुठलीही बोगस कंपनी किंवा बेहिशेबी संपत्ती नाही हे मी जबाबदारीने सांगतो. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी पुराव्यानिशी आरोप करावेत. हवेत आरोप करुन ठाकरेंना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नका. वैयक्तिक आरोप करुन मुख्यमंत्र्यांनी पराभव स्वीकारल्याचं स्पष्ट आहे," असं राहुल शेवाळे म्हणाले.
तसंच अमित शाह आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनीही त्यांची संपत्ती जाहीर करावी, अशी मागणीही खासदार शेवाळे यांनी केली.
"देवेंद्र फडणवीस हे आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात हतबल आणि अज्ञानी मुख्यमंत्री आहेत. त्यांना स्वतःच्या अधिकारांची आणि कारभाराची जाण नाही," असा टोलाही राहुल शेवाळे यांनी लगावला.