भाजप कार्यालयातच कार्यकर्त्यांचा डान्स, पाच जणांचे राजीनामे
एबीपी माझा वेब टीम | 16 Feb 2017 07:51 AM (IST)
वसई : मिरा भाईंदरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयातच डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजप कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यालयातच आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत हा डान्स केला होता. सोमवारी सोन्या नायक या कार्यकर्त्याचा बर्थडे होता. त्यानिमित्त मिरा रोडमधील कनाकिया येथील भैरव रेसिडेंसी या इमारतीतल्या भाजपच्या शहर कार्यालयात पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी काही गाण्यांवर डान्स केला. 'आज-कल तेरे मेरे प्यार के चर्चे...' या गाण्यावर महिला आणि पुरुष कार्यकर्ते थिरकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. डान्समध्ये अश्लीलता नसली, तरी कार्यालयात पार्टीचं आयोजन करुन पक्षाची शिस्त मोडल्याची भावना भाजपच्या वरीष्ठ पधादिकाऱ्यांनी वर्तवली. त्यामुळे भाजपच्या पाच कार्यकर्त्यांना आपला राजीनामा द्यावा लागला आहे.