कल्याण : "महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडलो याचा अर्थ आम्ही गद्दार नाही, मी शिवसैनिकच आहे. शिवसेना संपवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव होता म्हणून आम्ही बाहेर पडलो. आम्ही बाहेर पडून कोणत्या पक्षात विलीन झालो नाही. आम्हाला महाविकास आघाडी नको. महाविकास आघाडीतून बाहेर पडून जर गद्दार ठरवत असतील तर गद्दाराची व्याख्या काय ही त्या लोकांनी जाहीर करावी," असं आवाहन शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir) यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीत सामील झालेले कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आज (15 जुलै) पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी शिंदे सरकारच्या माध्यमातून शहरातील विकासकामे मार्गी लावण्यात येतील असं सांगितलं.


शहर प्रमुख मीच, राजीनाम्याचा प्रश्नच नाही मात्र निर्णय उद्धवजींचा
शिंदे गटातील कल्याण पश्चिमेचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर हे शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख आहे. शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्याच्या शहर प्रमुख पदाबाबत चर्चा होती. याबाबत बोलताना आमदार भोईर यांनी शहर प्रमुखपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. मी अजूनही शिवसैनिक आहे. उद्धवजी पक्ष प्रमुख आहेत त्यांनी माझी शहर प्रमुख पदी नियुक्ती केली होती. त्यांना पसंत असतील तर ते ठेवतील हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याचे भोईर यांनी सांगितलं.


आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देणं हा भूमिपुत्रांचा भावनिक प्रश्न : विश्वनाथ भोईर
नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचा नाव देण्याबाबतचा जो निर्णय आहे. तो मंत्रिमंडळात होईल, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला होता. मात्र सदर  बैठक वैध की अवैध हे सुद्धा अजून ठरलेलं नाही. मात्र दि बा पाटलांच्या नावाबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे नक्की आग्रह धरु. हा इथल्या भूमिपुत्रांचा भावनिक प्रश्न आहे आणि या भूमिपुत्रांचा आक्रोश आहे. त्यामुळे या प्रश्नाबद्दल मी मुख्यमंत्र्यांशी नक्की बोलणार आणि सकारात्मक उत्तर घेणार, विश्वनाथ भोईर यांनी असं सांगितलं.