मुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात नाणार रिफायनरी प्रकल्पाचा एमओयू होणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. तर ग्रामस्थांचा विरोध असल्यास नाणार रिफायनरी प्रकल्प लादणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
नाणार ग्रामस्थांना सोबत घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे अनेक दिग्गज नेतेही उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“नाणार ग्रामस्थांची जी भूमिका आहे, तीच शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेनेचा प्रकल्पाला ठाम विरोध आहे. ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना असहमती पत्राचे गठ्ठे दिले.”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच, “वाडवन बंदराला शिवशाहीचं सरकार असताना लोकांनी विरोध केला, तेव्हा तो रद्द केला होता. विकासाच्या नावाखाली वैभव मरु देऊ नका, हे आम्ही स्पष्ट केलं आहे.”, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. शिवाय, मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाला जाणार की नाही याचं उत्तर काळ देईल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नाणार ग्रामस्थ काय म्हणाले?
आमचा विरोध मावळला नसून अधिक उग्र झाला आहे आणि आमचा विरोध कायदेशीर आहे, असे नाणारचे ग्रामस्थ अरविंद सामंत यांनी सांगितले. शिवाय, प्रकल्प मंजुरीसाठी 70 टक्के स्थानिकांची सहमती लागते, मात्र आज 78 टक्के स्थानिकांनी असहमती पत्र दिले आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.
तसेच, “मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की, विरोध असल्यास प्रकल्प लादणार नाही. मात्र प्रकल्पाच्या फायद्याचे मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न करु, नाही पटले तर सक्ती करणार नाही. काही एनजीओ दिशाभूल करत आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पण आम्ही जनसुनावणी घेण्याची मागणी केली आहे.” अशी माहितीही ग्रामस्थ अरविंद सामंत यांनी दिली.
विरोध असल्यास नाणार प्रकल्प लादणार नाही : मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Feb 2018 10:27 PM (IST)
“नाणार ग्रामस्थांची जी भूमिका आहे, तीच शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेनेचा प्रकल्पाला ठाम विरोध आहे. ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना असहमती पत्राचे गठ्ठे दिले.”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -