मुंबई : मेट्रोच्या कामामुळे एखादी इमारत कोसळली, तर त्याला जबाबदार कोण? अशा शब्दात आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयानं मेट्रो रेल प्राधिकरणाला धारेवर धरलं.

कुलाब्यातल्या रहिवाश्यांनी मेट्रो-3 च्या कामाबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयानं हा सवाल उपस्थित केला आहे.

इतकंच नाही, तर भविष्यात फोर्ट परिसरातल्या जुन्या इमारतींना धोका पोहोचू नये, यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती देण्याचेही आदेश दिले आहेत.

मेट्रो प्राधिकरणाने आपला अहंकार कमी करावा, मी म्हणू तीच पूर्व दिशा अशी भूमिका घेऊ नये, असा शेराही उच्च न्यायालयाने लगावला. शिवाय हायकोर्टानं नेमलेल्या समितीसोबत काम करण्याचा आदेशही मेट्रो प्राधिकरणाला दिला.