मुंबई : आजपासून मुंबईत जर फेरीवाले प्लास्टिक वापरताना दिसले तर त्यांचा परवानाच थेट रद्द होणार आहे. प्लास्टिकबंदीनंतरही प्लास्टिकचा वापर सर्रास होत असल्याचं निदर्शनास आल्यानं मुंबई महापालिकेनं कारवाईचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेकडून विशेष पथक नेमण्यात आलं आहे. हे पथक प्रत्येक फेरीवाल्याची झाडाझडती घेतली जाणार असून प्लास्टिक पिशवी आढळल्यास तत्काळ परवाना रद्द केला जाणार आहे.


 रेल्वे, मेट्रो, एअरपोर्ट परिसरात प्लास्टिक बंदी मोडणाऱ्यांवर कारवाई  
प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीच्या अंमलबजावणीत पुढचा टप्पा गाठत रेल्वे, मेट्रो आणि विमानतळावरही कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. राज्य सरकारनं ही माहिती  मुंबई उच्च न्यायालयात दिली होती. त्यामुळे आता पालिकेतर्फे केवळ रस्त्यांवर नाही तर रेल्वे, मेट्रो आणि एअरपोर्ट परिसरात तेथील अधिकाऱ्यांनाही प्लास्टिक बंदीच्या नियमांअंतर्गत थेट कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.

रिसायकल न होणारं प्लास्टिक आणि 200 मि.ली. आणि त्यापेक्षा कमी क्षमतेच्या पेट बॉटल्सवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच हे सर्व प्लास्टिक वितरकांकडून परत घेऊन ते नष्ट करण्याची जबाबदारी ही उत्पादकांची असल्याचंही राज्य सरकारनं आधीच स्पष्ट केलं आहे.

राज्यात अखेर प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी त्याबाबतची घोषणा विधानसभेत केली होती. प्लास्टिक नैसर्गिक आणि जैविकदृष्ट्या विघटनशील नसतो. प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या इतर उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होत असल्याने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागातर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे प्लास्टिक विक्री करणाऱ्या आणि वापरणाऱ्या अशा दोघांवरही दंडात्मक कारवाईची तरतूद असेल. मात्र तरीही मुंबईत खुलेआम प्लास्टिकचा वापर होताना दिसत आहेत. म्हणूनच आता मुंबई महापालिकेनं कारवाईचा निर्णय घेतला आहे. आजपासून मुंबईत जर फेरीवाले प्लास्टिक वापरताना दिसले तर त्यांचा परवाना रद्द होणार आहे.