मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तानची निर्मितीच झाली नसती, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. लेखक विक्रम संपथ यांच्या 'सावरकर इकोज फ्रॉम फर्गटन पास्ट' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते. त्यावेळी स्वांतत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली.


...तर पाकिस्तानची निर्मितीच झाली नसती


स्वातंत्र्यवीर सावरकर भारताचे पंतप्रधान असते तर पाकिस्तानची निर्मिती झाली नसती. आमचं सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे, त्यामुळे मी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करत आहे. आपल्याला रत्नाची पारख नसेल तर जागतिक पातळीवर आपली नाचक्की होते, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं काम मी नाकारत नाही. मात्र देशात केवळ दोनच घराणी नाहीत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.



राहुल गांधी पंतप्रधान बनू शकणार नाहीत


राहुल गांधींवरही उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधींनी सावरकरांना पळकुटे म्हटलं होतं. त्यावेळी राहुल गांधींना नालायक बोलणारा मी पहिला होता, तसेत त्याला जोडे मारायला सांगणाराही मीच होतो. राहुल गांधी कधीच पंतप्रधान बनू शकणार नाहीत. एखाद्या देशाचा पंतप्रधान होण्यासाठी त्या देशीची माहिती असणेही आवश्यक असते. 'सावरकर इकोज फ्रॉम फर्गटन पास्ट' हे पुस्तक राहुल गांधींना वाचायला दिलं पाहिजे. तसंही त्यांच्याकडे आता खूप वेळ आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.


अंदमानचं कारागृह पिकनिक स्पॉट बनलाय


पंडीत नेहरु यांना वीर बोलण्यात काहीच वाटलं नसतं, जर ते काही मिनिट जरी तुरुंगात गेले असते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 14 वर्ष तुरुंगवास भोगला. मात्र सावरकरांनी ज्या तुरुंगात तुरुंगवास भोगावा लागला, तो आता पिकनिक स्पॉट झाला असल्याची खदखदही त्यांनी व्यक्त केली.