मुंबई : संभाजी भिडे यांना अटक होत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटक करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.

कोरेगाव- भिमा हिंसाचाराचा आरोप असलेल्या संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत आज एल्गार रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संभाजी ब्रिगेडने समर्थन दिलं आहे.

एल्गार रॅलीत सहभागी झालेले श्रीमंत कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संभाजी भिडेंना अटक न करण्याच्या षडयंत्रामागे मुख्यमंत्र्यांचा हात असल्याच्या संशयाला वाव आहे, असं कोकाटे म्हणाले.

त्यामुळे संभाजी भिडेंना अटक होत नसेल, तर मुख्यमंत्र्यांना अटक केली पाहिले, अशी मागणी श्रीमंत कोकाटेंनी केली आहे.

एल्गार रॅलीला पोलिसांची परवानगी नाही!

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात काढलेल्या या रॅलीला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. परीक्षा सुरु असल्याने रॅली काढू नका, वाहतुकीला अडथळा करु नका, असं आवाहन पोलिसांनी प्रकाश आंबेडकरांना केलं होतं. पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी दिली. मात्र रॅली काढण्यास परवानगी दिलेली नव्हती. मात्र तरीही प्रकाश आंबेडकरांनी रॅली काढली. दोन महिन्यांपासून मोर्चाची सूचना देऊनही सरकार भिडेंना पाठीशी घालतंय. शिवाय आंबेडकरी जनतेला दडपण्यासाठी पोलिसांच्या बळाचा वापर केला जात आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.

सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय
रॅलीला परवानगी नाकारुन सरकार लोकशाहीचा गळा दाबत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मोर्चासाठी जनता महाराष्ट्रातून निघाली आहे. त्यांना आता रोखणं कठीण आहे. त्यामुळे आज आम्ही सीएसएमटीला जमणार आणि तिथं काय तो निर्णय होईल, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तर मिलिंद एकबोटे यांच्या अटकेनंतर संभाजी भिंडेंना अटक होईल अशी अपेक्षा होती, मात्र, ती फोल ठरल्याचंही आंबेडकर म्हणाले.

संबंधित बातम्या

LIVE : एल्गार मोर्चा : मुख्यमंत्र्यांचं प्रकाश आंबेडकरांना चर्चेचं निमंत्रण

सरकारने लोकशाहीचा गळा दाबला : प्रकाश आंबेडकर