Loudspeaker Row : मुंबई : "मशिदीवरील भोंगे बळजबरीने काढले जात असतील तर, रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते संरक्षणासाठी मशिदीबाहेर उभे राहतील, मुस्लीम समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही," अशी भूमिका रिपब्लिक पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे. 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर 4 मे पासून मशिदींसमोर भोगें लावून हनुमान चालीसा म्हटली जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यावर रामदास आठवले यांनी ही भूमिका जाहीर केली आहे.


रामदास आठवले म्हणाले की, "मशिदीसमोर  हनुमान चालीसा लावत असाल तर त्याला आमचा विरोध नाही. आम्ही मनसेच्या मशिदीवरील भोंगे काढण्याच्या भूमिकेच्या विरोधात आहोत. बळजबरीने लाऊडस्पीकर काढता कामा नये. आवाज कमी करण्यासंदर्भात आपण सूचना देऊ शकतो. पोलीस आणि सरकारने त्याबाबत ठरवावं. भाजपने जरी याचं समर्थन केलं असलं तरी माझे आणि माझ्या पक्षाचे मनसेच्या भूमिकेला समर्थन होतं असं नाही. जर राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी 4 मे पर्यंतचं अल्टिमेटम दिलं तर मशिदीच्या बाहेर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सुरक्षा प्रदान करतील.


राज ठाकरे म्हणतात की हा विषय धार्मिक नाही सामाजिक आहे, पण तसं नाहीय, हा विषय तेवढाच धार्मिक आहे. मशिदीवरचे भोंगे काढण्याबाबत कुठल्याही तक्रारी आतापर्यंत नाहीत. हे आधीपासून सुरु आहे मग ते भोंगे कशाला काढायचे. ते पण आपल्या सणांना तक्रार करत नाहीत. हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद होता कामा नये. यावर केंद्राने धोरण ठरवावं असं बोललं जात आहे तर त्यावर विचार करु आणि या लाऊडस्पीकरबाबत सर्वत्र एकच निर्णय घेता येईल हा सध्यातरी पर्याय आहे.


दरम्यान, भाजप-मनसे कथित युतीबद्दल बोलताना रामदास आठवले म्हणाले की, भाजप जर मनसेला पाठिंबा देत असेल तरी सुद्धा भाजप आणि मनसे एकत्र येणार नाहीत. जर ते एकत्र आले तर पक्षाची भूमिका आम्ही ठरवू, मात्र आम्ही सध्या तरी भाजपसोबत आहोत.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Loudspeaker Controversy: ...तर कठोर पावले उचला; गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश


आवश्यक वाटल्यास औरंगाबादचे पोलीस आयुक्त आजच राज ठाकरेंवर कारवाई करतील : पोलीस महासंचालक