Just.B. N. Srikrishna: न्यायाधीश आणि पत्रकार हे सत्यापासून डगमगले तर लोकशाही कोसळणार असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी.एन. श्रीकृष्णा (Justice B.N. Srikrishna) यांनी केले. भारत अजूनही स्वतंत्र देश आहे. मात्र, मागील काही घटनांमध्ये पत्रकारांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. पत्रकारांना लक्ष्य करत राहिल्यास, पत्रकार डगमगल्यास लोकशाही टिकवण्याची ताकद हा चौथा स्तंभ गमावेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 


'मुंबई प्रेस क्लब'च्यावतीने (Mumbai Press Club)  शनिवारी, आयोजित करण्यात आलेल्या रेड इंक पुरस्कार (Red Ink Award) सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून न्या. श्रीकृष्ण यांनी भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, भारतीय राज्यव्यवस्थेत पत्रकारितेला चौथा स्तंभ म्हटले जाते. संसद, प्रशासन, न्यायपालिका हे तीन उर्वरित लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत. यातील न्यायपालिका आणि पत्रकारिता हे दोन स्तंभ ढगमगल्यास लोकशाही कोसळू शकते. 


न्या. श्रीकृष्ण यांनी आपल्या भाषणात रामायणाचा संदर्भ दिला. त्यांनी म्हटले की, लंकेला उद्धवस्त होण्यापासून सीतेला श्रीरामाकडे पुन्हा सोपवावे असा सल्ला विभीषणाने रावणाला दिला होता. मात्र, रावणाने त्यालाच सत्तेतून बाहेर काढले. माझा भाऊ असतानाही तू माझ्याविरोधात कसा बोलला असे रावणाने विचारले. त्यावर विभीषणाने म्हटले की, तु्म्हाला नेहमी गोड बोलणाऱ्या व्यक्ती आजूबाजूला दिसतील. मात्र, तुम्हाला कटू असले तरी सत्य सांगणाऱ्या व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. तुम्हाला सत्य ऐकावे लागेल असे विभीषणाने रावणाला सांगितले. पत्रकारांचेही काम सत्य सांगणे हेच आहे. मोठ्या शक्ति असल्या तरी त्यांना सत्य सांगावे हेच पत्रकाराचे काम असल्याचे त्यांनी म्हटले. 


यावेळी तरुण पत्रकारांना सल्ला देताना म्हटले की, तुम्ही प्रामाणिकता हे सर्वोत्तम धोरण असलेल्या क्षेत्रात काम करत आहात. विवेकाने वागणे, निर्णय घेणे ही तुमची जबाबदारी आहे. आपण करत असलेल्या काम हे समाजाच्या हिताचे आहे का, नागरिकांचे त्यातून चांगले हित साधले जाणार याचा विचार करावा. चांगल्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यातील धमकी, भीतीकडे दुर्लक्ष करा असे आवाहनही त्यांनी केले. 


भारत अजूनही स्वतंत्र देश आहे, यावर माझा विश्वास आहे आणि तसे वातावरण आहे. मात्र, काही गोष्टी या चिंता वाढवणाऱ्या आहेत. पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांची होणारी गळचेपी हा मुद्दा फक्त पत्रकारांच्या अथवा त्यांच्या संस्थांच्या चिंतेचा विषय नसून सगळ्यांच्या चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले. पत्रकारांना धमकी देऊन गळचेपी होत राहिल्यास लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळण्याची भीती असल्याचे न्या. बी.एन. श्रीकृष्ण यांनी म्हटले. विपरीत परिस्थिती निर्माण झाल्यास एकत्रितपणे त्याला सामोरे जाऊ. आजची तरुण पिढी ही त्याचा धैर्याने मुकाबला करण्यास सक्षम असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.