मुंबई | मुंबईला वाशी आणि पुण्याशी जोडणाऱ्या सायन-पनवेल महामार्गावर नादुरुस्त अवस्थेत असलेला पादचारी पूल हटविताना क्रेन उलटून अपघात झाला आहे. त्यामुळे संध्याकाळपासून मुंबईकडे येणारी आणि वाशीकडे जाणारी अशा दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

वाशी खाडीजवळ असलेला जकात नाक्यासमोर अर्धवट अवस्थेत पडलेला पादचारी पूल हटविण्याचे काम आज सकाळपासून सुरु होतं. चार वाजताच्या दरम्यान या मार्गावरील वाहतूक बंद करून क्रेनच्या साहाय्याने हा पादचारी पूल हटवण्यास सुरुवात झाली, तेव्हा पुलाचं वजन जास्त झाल्यामुळे क्रेन पुलासह रस्त्यावर उलटली.

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण मुंबईच्या खूप महत्त्वाचा असलेल्या या महामार्गावर संध्याकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाशी पूल ओलांडून टोल नाक्यापर्यंत मुंबई वाहिनीवर तर मानखुर्द जंक्शनपासून वाशी वाहिनीवर वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या आणखी एका मोठ्या क्रेनच्या साहाय्याने ही क्रेन आणि पादचारी पुलाचा सांगाडा हटविण्याचे काम सुरु आहे.