Ideas of India 2023 : हवामान बदलाविषयी बोलणं म्हणजे, मृत्यूबद्दल बोलण्यासारखं लोकांना वाटत आहे. त्यामुळं हवामान बदलासंदर्भात लोक बोलत नसल्याचं वक्तव्य प्रसिद्ध लेखक अमिताभ घोष (writer Amitav Ghosh) यांनी केलं. एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया समिट'मध्ये (Ideas of India 2023) घोष बोलत होते. यावेळी घोष यांनी हवामान बदलाशी संबंधित विषयावर भाष्य केलं. जगात हवामान बदलाचे परिणाम  दिसू लागलेत. सुंदरबनमध्ये (Sundarban) येणारी चक्रीवादळं, मुंबई आणि जगातील इतर देशांमध्ये समुद्राच्या पाणी पातळीत होत असलेली वाढ. ही वाढत जाणारी पाण्याची पातळी धोक्याची घंटा असल्याचे घोष म्हणाले.


मुंबईतील सर्व श्रीमंतांना त्यांच्या घरातून समुद्राचे दृश्य पहायचे आहे'


चक्रीवादळं अशीच येत राहिली तर एखाद्या दिवशी हिंदी महासागरातून सुरू झालेलं चक्रीवादळ थेट मुंबईला धडकेल. त्यामुळं या शहरात राहणारी लोकसंख्या संपुष्टात येईल अशी भीती देखील अमिताभ घोष यांनी व्यक्त केली. कारण एवढ्या मोठ्या लोकसंख्येची या संकटातून सुटका करणं शक्य होणार नसल्याचे घोष म्हणाले. सरकारच्यावतीनं जरी लोकांना मुंबई सोडण्याचे आवाहन केले तरी काही लोक सोडणार नाहीत. कारण त्यांचे आयुष्यभराचे संपूर्ण भांडवल त्या शहरात असल्याचे अमिताभ घोष म्हणाले.


हवामान बदलाचा शेती पिकांना मोठा फटका 


पंजाब आणि हरियाणामध्येही  तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या हवामान बदलामुळं जगातील शेतीचेही मोठं नुकसान होत असल्याचे घोष यांनी सांगितले. वातावरणातील बदलामुळं पंजाबमध्ये गहू आणि भातशेतीचं मोठं नुकसान झाल्याचे घोष म्हणाले.


आयडियाज ऑफ इंडिया समिटचा आज शेवटचा दिवस 


एबीपी नेटवर्कच्या वतीनं 'आयडियाज ऑफ इंडिया'  दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. आज या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे.  मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात देशातील आणि जगातील विविध राजकीय, सांस्कृतिक आणि कलाविश्वातील प्रसिद्ध व्यक्तींना एकाच व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलं आहे. शुक्रवारी यूकेच्या (UK) माजी पंतप्रधान लिझ ट्रस (Liz Truss) आणि सीईओ अविनाश पांडे (CEO Avinash Pandey) यांनी दीप प्रज्वलन करुन 'आयडियाज ऑफ इंडिया'च्या समिटचे उद्घाटन केले. आपण आज कुठे आहोत आणि उद्या कुठे असणार हे समजून घेण्यासाठी सर्वजण एकत्र जमलो असल्याचे अविनाश पांडे म्हणाले. आम्ही या व्यासपीठावर जगातील आणि देशातील सर्वोत्तम विचार असलेल्या मान्यवरांना आणल्याची माहिती पांडे यांनी दिली.


महत्त्वाच्या बातम्या:


Climate Change : येत्या काळात 'ही' शहरं पूर्णपणे होणार जलमय? ही आहेत कारणं