मुंबई : मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर आज पुन्हा एकदा परप्रांतिय मजुरांनी तुफान गर्दी केली होती. सकाळी नऊ वाजता मजूर मोठ्या प्रमाणात स्टेशन परिसरात जमले होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला. यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांनी यश आलं. यापूर्वी पहिला लॉकडाऊन 14 एप्रिल रोजी संपल्यानंतर वांद्र रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आता तसाच प्रकार पुन्हा एकदा वांद्रे रेल्वे स्टेशनवर घडला आहे.
दरम्यान बिहारला जाणाऱ्या श्रमिक स्पेशल ट्रेनमधून जाण्यासाठी हे परप्रांतिय मजूर वांद्रे टर्मिनसवर आल्याचं कळतं. पोलिसांनी आता स्टेशनवरील संपूर्ण गर्दी पांगवली आहे. तर नोंदणी केलेल्या जवळपास 1000 मजुरांना ट्रेनमध्ये प्रवेश देण्यात आला.
दरम्यान या सगळ्या प्रकारावर पश्चिम रेल्वेने ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. पश्चिम रेल्वेच्या ट्वीटनुसार, "19 मे 2020 रोजी राज्य सरकारच्या वतीने नोंदणी केलेल्या प्रवाशांसाठी वांद्रे टर्मिनस ते पूर्णिया श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आली. त्यासाठी नोंदणी न केलेले अनेक लोक पूल आणि रस्त्यावर जमा झाले होते. नोंदणीकृत प्रवाशांना घेऊन ट्रेन रवाना झाल्यानंतर उर्वरित गर्दी पांगली."
"सध्या स्टेशनवरील सर्व तिकीट काऊंटर बंद आणि तिथून कोणतंही तिकीट मिळत नाही. श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये राज्य सरकारकडे नोंदणी केलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी दिली जाते. त्यामुळे लोकांनी कोणत्याही कारणाशिवाय स्टेशनवर येऊ नये आणि गर्दी करु नये," असं आवाहनही पश्चिम रेल्वेने पुढच्या ट्वीटमध्ये केलं आहे.
Bandra Station | Migrant workers | मुंबईतल्या वांद्रे टर्मिनसवर सकाळच्या सुमारास तुफान गर्दी