नवी मुंबई : बारावी मराठी विषयाचा पेपर फुटला नाही. त्यामुळे मराठीचा पेपर पुन्हा होणार नाही, असं मुंबई विभागीय शिक्षण बोर्डाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
बारावी मराठीची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याआधीच काही काळ फुटल्याची माहिती समोर आली होती. परीक्षा सुरु होण्याआधी 5 मिनिटं आधीच मराठीचा पेपर सोशल मीडियावर लीक झाल्याचं समोर आलं होतं. यासंदर्भात बोर्डाकडे तक्रारही दाखल करण्यात आली होती.
यासंदर्भात मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय म्हणाले की, परीक्षा केंद्रावर 10 वाजता पेपर उघडला जातो. त्यानतंर तो पर्यवेक्षकांकडे देण्यात येतो. सरकारच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या हातात 10 मिनिटं आधी पेपर दिला जातो. यावेळी कोणीतरी खोडसाळपणा केल्याची शक्यता आहे. व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या पेपरच्या फोटोवर 10.46 ची वेळ आहे. त्यामुळे ज्याने हा पेपर व्हायरल केला आहे, त्याच्या मोबाईलमध्ये 5 मिनिट वेळ मागे असण्याची शक्यता आहे.
परीक्षा सुरु होण्याआधीच बारावी मराठीचा पेपर व्हॉट्सअॅपवर!
दरम्यान, सायबर क्राईम सेलकडे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे.
सोशल मीडियावरुन अशा पद्धतीने पेपर लीक होण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी 2015 आणि 2016 मध्येही अशाच प्रकारे बारावीचे पेपर लीक झाले होते. यंदाही पेपर लीक झाल्याने खळबळ उडाली आहे.