मुंबई : राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. या समस्येबरोबरच आता साथीचे रोगदेखील बळावण्याची मोठी समस्या समोर उभी आहे.

लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया, कावीळ इत्यादी पावसाळी आजार पसरण्याची भीती मुंबईसह राज्यात आहे. या आजारांपासून मुंबईकरांना दूर ठेवण्यासाठी मुंबई मनपा सज्ज झाली आहे. शिवसेना आणि मुंबई मनपाच्या आरोग्य विभागाने ठिकठिकाणी जनजागृती आणि आरोग्य शिबिरे घेण्यास सुरुवात केली आहे.

पालिकेचे डॉक्टर मुंबईकरांना पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून कोणती काळजी घ्यावी? याबाबत मार्गदर्शन करत आहेत. पिण्याचे पाणी हे उकळूनच प्यावे, थोडा जरी ताप असल्यास त्वरित पालिकेच्या रुग्णालयात तपासणी करावी, अशा अनेक सूचना करण्यात येत आहेत.

पावसाळ्यात होणाऱ्या आजारांची कोणतीही लक्षणे दिसल्यास त्यावर त्वरित औषधे आणि उपाययोजना केल्या जात आहेत. बदलापूर येथे झालेल्या पूरपरिस्थितीबाबत पालिकेतल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तिथल्या नागरिकांनी काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले आहे.