मुंबई : मुंबईत आगामी काळात 10 लाखात वन बीएचके घर मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये काल 10 लाखात वन रुम किचन घर मिळेल, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
ही घरे बांधकाम खर्चातच विकली जाणार आहे. त्यामुळे जवळपास 350 चौरस फुटांचं घर अवघ्या 10 लाखात मिळण्याची शक्यता आहे. ही घरे मिठागराच्या जमिनी, मुंबई पोर्ट ट्रस्ट आदींच्या जमिनींवर उभारण्यात येतील, असं म्हटलं जात आहे.
सध्या सामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी एकूण 11 योजना आहेत. त्यांची अंमलबजावणी करुन नव्या पद्धती आणि पर्यायांचा शोध विकास आराखड्यात करण्यात आला आहे.
या योजनांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना, उपकरप्राप्त इमारतींचा विकास, सहकारी गृहनिर्माण संस्थांचा विकास, म्हाडाच्या इमारतींचा विकास, खुल्या बाजारात विकल्या जाणाऱ्या इमारती, प्रधानमंत्री आवास योजना, मुंबई पोर्ट ट्रस्ट अशा योजनांतून सामान्य मुंबईकरांना परवडणारी घरे बांधली जातील.