भाईंदर : भाईंदरच्या पाली गावातल्या एका बंद घरात रहस्यमयरित्या खड्डा खोदण्यात आल्यामुळे जादूटोण्याचा संशय निर्माण झाला आहे. घराच्या मालकणीच्या तक्रारीवरुन उत्तन सागरी पोलिसांनी अतिक्रमणाचा गुन्हा चार जणांवर दाखल  केला आहे. मात्र खड्डयाभोवती पूजेचं कोणतंही साहित्य आढळलं नसून, हा खड्डा का खणला गेला याचा तपास आता पोलीस करत आहेत.


भाईंदरच्या उत्तनजवळील पाली गावात वलिना पटेल यांच्या मालकीचा पटेल व्हीला घर आहे. पटेल हे कुर्ल्याला रहात असून, वीक एन्डला राहण्यास ते उत्तनमधील घरी येतात. सांभाळण्यासाठी त्यांनी एकाजवळ घरची चावी दिली होती.



वलिना पटेल यांच्या नातेवाईक रेनीटा पटेल यांनी 28 जानेवारीला घरात गेल्या असता, त्यांनी घरात लादी काढून एक खड्डा खणल्याचं दिसलं. त्यांनी वलिना पटेल यांना तातडीनं बोलावून घेतलं. घरात काहीतरी आगळावेगळा प्रकार घडण्याचा संशय आल्याने वलिना पटेल यांनी उत्तन सागरी पोलिसांना बोलावून घेतलं.

पोलिसांना घटनास्थळी भेट दिली. तेथे पोलिसांना जादूटोण्याचे साहित्य तसेच पूजेचं कोणतंही साहित्य आढळून आलं नाही. केवळ खोदकामाच साहित्य आढळून आलं. वलिना पटेल यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चार जणांविरुद्धात सध्या अतिक्रमणाचा गुन्हा दाखल केला आहे. चार जणांना शोधण्याचं काम सुरु केलं आहे.