हिंगोली : "मुख्यमंत्री महोदय तुमच्या शासन व्यवस्थेने आमच्या अंगाच्या चिंधड्या करून ठेवल्या" असे उद्विग्न वाक्य लिहुन शेतीतील समस्यांनी त्रस्त झालेल्या हिंगोलीच्या एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे थेट नक्षलवादी होण्याची परवानगी मागितलीय. मुख्यमंत्र्यांच्या नावे एक पत्र लिहुन त्याने आपली कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय.


हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील टाकतोडा गावचे शेतकरी नामदेव पतंगे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हंटले आहे. माझे वडील, माझे आजोबाही शेतीच करायचे. मग आमचा वडिलोपार्जित व्यवसाय जर शेती असेल तर आम्हाला एक वर्षीचा दुष्काळ का सहन होऊ नये? मुख्यमंत्री महोदय तुमच्या शासन व्यवस्थेने आमच्या अंगाच्या चिंधड्या करून ठेवल्या. तुम्ही कर्जमाफी दिलीत पण ती आमच्यापर्यंत पोचलीच नाही, तुम्ही योजना आणली पिकेल ते विकेल पण आमच्याकडे पिकलंच नाही तर विकावं काय? तुम्ही पिकलं नाही म्हणुन अनुदान दिलंय. पण नुकसान एक हेक्टर आणि मदत नऊ हजार. तुमचे लाईनमन दादागिरी करायला लागेलत, न सांगताच लाईन कापत आहेत. तुमच्या बँका अजुनही शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायला तयार नाहीत. मग किमान नक्षलवादी होण्याची परवानगी तरी द्या. तुमच्या महाराष्ट्रातील एक अभागी शेतकरी, नामदेव पतंगे. अशा आशयाचे पत्र हे नामदेव पतंगे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. ही कैफियत केवळ माझीच नसुन माझ्यासारख्या हजारो तरुणांची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



मागच्या काही दिवसातील शेतीतील परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. खरिपाच्या सुरुवातीला पावसाने ताण दिला, त्यात सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा प्रश्न निर्माण झाला. पुन्हा अतिवृष्टी झाली, हजारो हेक्टरवरील जमिनी खरडल्या गेल्या. शेतीतील पीक उद्धवस्त झालं. शासकीय मदत देण्यात आली. मात्र, ती मदत ही नुकसानापेक्षा अत्यंत कमी मिळाली. पीक विम्याचाही प्रश्न निर्माण झाला, एक ना अनेक अशा समस्यांनी शेतकऱ्यांचे मोठे हाल केले आहेत. त्यातच आता वीज कट करण्यात येत असल्याने पाणी असुनही शेती आणि जनावरांना पाणी देता येत नाहीये त्यामुळे शेतकरी अजूनच संतापलेत त्यातुनच नामदेव पतंगे यांनी उद्विग्न होऊन मुख्यमंत्र्यांकडे थेट नक्षलवादी होण्यासाठी परवानगी मागितलीय.