मुंबई : मागच्या अनेक महिन्यापासून बंद असलेली महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे याच संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरिता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 22 फेब्रुवारी रोजी वरळी येथे जांबोरी मैदानावर शैक्षणिक समस्या सोडवण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसोबत चर्चा संवादाच्या एक कार्यक्रम आयोजित केला आहे.


सदर कार्यक्रमाचा खर्च हा मुंबई व SNDT विद्यापीठाने द्यावा असा अध्यादेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने दिला आहे.राजकीय कार्यक्रमांना महाविद्यालय ,विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणे ,विद्यार्थ्यांच्या पैशांतून वर्तमानपत्रात जाहिरात देणे त्याचसोबत होर्डिंग ,बॅनर अशा विविध माध्यमातून स्वतःची प्रसिद्धी करवून घेणे हे चुकीचे आहे. शिवाय,विद्यापीठाच्या खर्चातून मंत्र्यांचे कार्यक्रम करणे म्हणजे पैशाचा / विद्यापीठाच्या पैशाचा अपव्यय आहे असे अभाविपने आरोप करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे


मंत्रालयाने दिलेल्या अध्यादेशामध्ये कोल्हापुर, सोलापुर, गडचिरोली ई.विद्यापीठाने केलेल्या आयोजनाप्रमाणे मुंबई व SNDT विद्यापीठाने व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहे. महत्वाचे म्हणजे शासनाने विद्यापीठांना अशा प्रकारचे शासकीय कार्यकमाचे आयोजन करण्याचे आदेश देणे हे सर्वथा चुकीचे असल्याचं मत अभाविप व सिनेट सदस्यांनी व्यक्त केला आहे.


मंत्री उदय सामंत यांनी चमकोगिरी सोडून शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेवर लक्ष द्यावे- आ. अतुल भातखळकर


विद्यापीठातील समस्या समजून घेण्याचे कारण पुढे करत स्वतःच्या प्रसिद्धीसाठी 'उच्चशिक्षण मंत्रालय @ वरळी' असे जनता दरबाराचे कार्यक्रम आयोजित करायचे आणि या कार्यक्रमाच्या खर्चाचा बोजा अगोदरच कोरोनामुळे अपुरा निधी मिळत असल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यापीठांवर टाकण्याचा घाट ठाकरे सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घातला आहे. विद्यापीठांशी संबंधित विषयाचा कार्यक्रम वरळीला घेऊन ‘युवराजांना’ खुश करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. आपली जबाबदारी ओळखून राज्यातील शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेवर भर देण्याचे सोडून उच्च शिक्षणमंत्र्यांनी केवळ चमकोगिरी करण्याचे काम सुरू केले असल्याची टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.