मुंबई : महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्‍टरांची संघटनाच्या (मार्ड) वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. संपकरी डॉक्‍टरांवर कारवाई करण्याची मागणी यात याचिकादाराने केली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सामाजिक कार्यकर्ता अफाक मांडवीया यांनी अॅड. दत्ता माने यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. राज्यभरातील लाखो रुग्णांना वेठीस धरुन मार्डचे डॉक्‍टर काम बंद आंदोलन करत आहेत. यामुळे रुग्णांचे हाल होत असून अनेक गंभीर रुग्णांनाही उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे तातडीने हा संप मागे घ्यावा आणि डॉक्‍टरांनी तात्काळ कामावर रुजू व्हावे, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे. तसेच संपाच्या पार्श्वभूमीवर 'मेस्मा' कायद्यानुसार डॉक्‍टरांवर कारवाई करण्याची मागणीही याचिकेत केली आहे. संपकरी डॉक्‍टरांना कारणे दाखवा नोटीस बजावा आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणीही याचिकादारांनी केली आहे.

मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी होईल. यापूर्वी मार्डने पुकारलेल्या संपांबाबत मुंबई उच्च न्यायालयात वेळोवेळी निर्देश दिले आहेत. मार्डने साल 2013 आणि साल 2016 मध्ये न्यायालयात हमीपत्र दाखल केले आहे की, यापुढे संप किंवा कामबंद आंदोलन करणार नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या या संपामुळे कोर्टाचाही अवमान झाल्याचा दावा याचिकादारांनी केला आहे.

वाचा : राज्यातील 4500 निवासी डॉक्टर बेमुदत संपावर