मुंबई  : बॉलिवूडचं नवविवाहित दांपत्य 'दिपवीर' यांना मुंबई उच्च न्यायालयाकडूनं तूर्तास दिलासा मिळाला आहे. एआयबी प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला दिलेली स्थगिती हायकोर्टानं पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवली आहे. या संदर्भात दाखल एका जनहीत याचिकेवर इतर याचिकांसह एकत्र सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी गुरूवारी करण्यात आल्यानं न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठानं आधीचे निर्देश कायम ठेवत या याचिकेवरील सुनावणी तूर्तास स्थगित केली आहे.

 

डिसेंबर 2014 मध्ये मुंबईच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया इथं आयोजित एआयबी रोस्ट या कार्यक्रमात महिलांच्या बाबतीत अत्यंत बिभस्त आणि कमरेखालचे विनोद करण्यात आले होते. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ता आभा सिंग यांनी जोरदार विरोध करत यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


तक्रारदार संतोष दौंडकर यांनी गिरगाव कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयानं फेब्रुवारी 2015 मध्ये यासंदर्भात मुंबई पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरसह आणि इतरांनी हायकोर्टात वेगळी याचिकाही दाखल केली आहे.


याप्रकरणी रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर सह करण जोहर, दीपिका पादुकोण, आलिया भट यांच्यासह कार्यक्रमाच्या आयोजकांचाही समावेश आहे. समाजात एकीकडे महिलांवर अत्याचार होत असताना सार्वजनिक ठिकाणी महिलांवर इतक्या खालच्या पातळीवर केलेल विनोद कसे काय खपवून घेतले जातात? आणि तिथं दीपिका आणि आलिया सारख्या तरूण पिढीच्या प्रतिनिधी हसत हसत हे विनोद कसे काय एन्जाॅय करू शकतात? असा सवाल या याचिकेतून विचारण्यात आला आहे.