मुंबई : संपूर्ण नाशिकला हादरवून टाकणाऱ्या 2016 मधील सातपूर दुहेरी हत्याकांडातील आरोपीला सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करुन मुंबई उच्च न्यायालयानं त्याला निर्दोश मुक्त केलं आहे. एका विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न करून तिच्यासह तिच्या सहा वर्षांच्या मुलाची चाकून 52 वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती.


या प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं घरमालकाच्या मुलाला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र नाशिक सत्र न्यायालयानं हा निकाल सुनावताना ग्राह्य धरलेले सर्व मुद्दे हायकोर्टात खोडून काढण्यात आरोपीचे वकील अनिकेत निकम यांचा जोरदार युक्तिवाद यशस्वी ठरला आहे. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठानं मंगळवारी हा निकाल दिला आहे.


घटनेनंतर आरोपी रामदासनं आपला मित्र सुभाष राजपूत याच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून गुन्ह्याची कबुली दिली होती. त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेला आरोपीचा कबुली जबाब पुरावा म्हणून सादर करण्यात आला होता. मात्र सुनावणी दरम्यान राजपूतला फितूर घोषित करण्यात आलं. तसेच मयत व्यक्तींवर चाकून सपासप 52 वार करण्यात आले, मात्र शेजाऱ्यांनी कोणताही आवाज ऐकला नसल्याचं सांगितलं होतं. तेव्हा या घटनेचा कुणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, सरकारी पक्षाची सारी केस ही परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारीत आहे. तसेच पुराव्यांशी छेडछाड झाल्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद हायकोर्टात अनिकेत निकम यांच्याकडून करण्यात आला.


काय होती घटना?


17 मार्च 2016 च्या रात्री हे दुहेरी हत्याकांड घडले होते. कचरु संसारे हे त्यांची 30 वर्षीय पत्नी पल्लवी, 6 वर्षीय मुलगा विशाल आणि तीन मुली यांच्यासोबत रंगनाथ शिंदे यांच्या घरात भाडेकरु म्हणून राहत होते. घटनेच्या दिवशी तिन्ही मुली बाहेरगावी गेल्या होत्या. तर संसारे हे कामावर रात्रपाळीसाठी गेले होते. ही संधी साधत घरमालकाचा मुलगा रामदास शिंदे हा पल्लवी यांच्यावर अतिप्रसंग करण्याच्या उद्देशाने त्यांच्या घरात शिरला. विवाहितेने विरोध करताच रामदासनं रागाच्याभरात चाकूने वार करून तिला ठार केले. त्याच वेळी पल्लवी यांचा मुलगा विशाल जागा झाला. त्यावेळी आरोपीने त्यालाही ठार केल्याचा आरोप करत सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्यासमोर पार पडली होती.


26 एप्रिल 2018 ला दिलेल्या निकालात कोर्टानं हे हत्याकांड दुर्मिळातील दुर्मिळ ठरवलं होत. पल्लवी यांच्यावर 28, तर निष्पाप विशालवर 24 वार करण्यात आले होते. या घटनेचा कोणी साक्षीदार राहू नये, म्हणूनच आरोपीने लहान मुलाला ठार केले. आरोपीने हे दोन्ही खून अतिशय थंड डोक्याने केले. त्यामुळे अशा व्यक्तीला समाजात जगण्याचा अधिकार नाही, असं मत नोंदवत रामदास शिंदेला फाशीची शिक्षा सुनावली होती.