तिकडे सायन ते दादरपर्यंतची रस्तेवाहतूक बंद आहे. अनेक रस्तांवर वाहनांची तोबा गर्दी आहे. थोडक्यात मागच्या काही तासात झालेल्या पावसानं मुंबईनं चहुबाजूंनी कोंडी झालीय.
रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहनांबरोबरच पायी चालणाऱ्यांनाही मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागतेय. पश्चिम द्रृतगती महामार्ग, पूर्व दृतगती महामार्गाबरोबरच मुंबई-पुणे महामार्गाचा वेगही कमालीचा मंदावला आहे.
अशा परिस्थितीत मुंबईकरांची लाईफलाईन अर्थात लोकल रेल्वे जिथल्या तिथे स्तब्ध झाल्या आहेत. ट्रॅकवर पाणी आल्याने रेल्वे जिथल्या तिथेच थांबल्या आहेत. काही प्रवासी ट्रॅकवर उतरून चालत पुढे जात आहेत. तर काही रेल्वेतच बसून आहेत.
अशा वेळी रेल्वे पोलिसांना चार महिला रेल्वेतच अडकल्याचा फोन आला. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी थेट ट्रॅकवरुन गुडघाभर पाण्यातून चालत जाऊन, त्या महिलांना मदतीचा हात देऊ केला.
सायन ते माटुंगादरम्यान रेल्वे पोलिसांचा हा चित्तथरारक प्रवास कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रेल्वे पोलीस असो, मुंबई पोलीस असो, वाहतूक पोलीस असो वा अन्य कोणतीही सुरक्षा यंत्रणा,. त्यांचं जे काम सुरु आहे, ते पाहून कोणीही माणूस त्यांना एक कडक सॅल्युट ठोकेल हे नक्की.