Mumbai News: राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी पहाटेपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. आकाशात काळ्या ढगांची गर्दी असल्याने मुंबईत सकाळी 10 वाजले तरी अंधार पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने मुंबईत (Mumbai Rains) पुढील दोन ते तीन तासांत मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहतील, असा अलर्ट दिला होता. त्यानुसार, गेल्या तासाभरापासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. किंग्ज सर्कल, वडळा, सायन आणि माटुंगा या परिसरात जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. चुनाभट्टी येथील एका चाळीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. तर मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकात (Mumbai Local Train) रुळांवरही पाणी साचायला सुरुवात झाली आहे. (Heavy Rain in Mumbai)

Continues below advertisement

आज सकाळपासूनच मुंबईतील मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेचा वेग मंदावला होता. मात्र, आता माटुंगा रेल्वे स्थानकात जास्त पाणी साचल्याने लोकल ट्रेनचा वेग आणखी मंदावण्याची शक्यता आहे. यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. ठाणे स्टेशनवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या जलद आणि धिम्या गतीच्या लोकल गाड्या या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्याचे अनाउन्समेंट सुद्धा रेल्वे स्थानकावर केली जात आहे. मध्य रेल्वेच्या मशीद बंदर रेल्वे स्थानकातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. साचलेले पाणी जवळपास फलाटाच्या उंचीला पोहोचल्याने मध्ये रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी 10 वाजता वाहनांच्या हेडलाईट सुरु असल्याचे अनोखे चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे.  पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. पुढील दोन तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मध्य रेल्वेमार्गावरील अन्य स्थानकांवरही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचू शकते. मुंबईत पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेने युद्धपातळीवर तयारी केली होती. मात्र, पालिकेचे हे सर्व दावे पहिल्याच पावसात फोल ठरताना दिसत आहेत.

Continues below advertisement

Raigad News: ठाण्यात आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस

मुंबईत जोरदार पाऊस असला तरी ठाण्यात अद्याप तुरळक पावसाच्या सरी बरसत आहेत. तर अंबरनाथ, बदलापूर परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. कर्जत तालुक्यातही पावसाचा जोर जास्त आहे. त्यामुळे मे महिन्यातच उल्हास नदीला पूर आला आहे. या नदीवरील नेरळ दहिवली येथील पुलावरून सध्या पाणी वाहत आहे.

आणखी वाचा

मुंबईत सकाळी 10 वाजता अंधार, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांचे हेडलाईट ऑन, प्रचंड वाहतूक कोंडी PHOTO