मुंबई : मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं असून लोकल वाहतूकही मंदावली आहे.   दक्षिण मुंबई, पूर्व-पश्चिम उपनगरात दमदार पाऊस मुंबईतील वरळी, लालबाग लोअर परेल, दादर, माटुंगासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. पश्चिम  उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली इथेही वरुणराजाने हजेरी लावली आहे. शिवाय विक्रोळी, घाटकोपर, पवई, भांडुप, ठाणे, डोंबिवलीमध्ये पाऊस सुरु आहे. तसंच नवी मुंबईतील वाशी, पनवेलमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे.   काही ठिकाणी पाणी साचलं दोन दिवस पावसाची संततधार होती, मात्र मध्यरात्रीनंतर पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. आजही मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. माटुंगा, हिंदमाता यांसारख्या सखल भागात पाणी साचलं आहे.   लोकल वाहतूक उशिराने दरम्यान, पावसामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरु आहे. सुदैवाने रस्ते वाहतुकीला सध्या तरी फटका बसल्याचं चित्र नाही. मात्र हा पाऊस असाच सुरु राहिल्यास ऐन कामाच्या वेळी मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.