मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सर्वांनाच घरात बसावे लागत आहे. मात्र, अशा परिस्थितीतही पोलीस बांधव आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. नागरिकांचं संरक्षण करणे आणि राज्यात कायदा व सुव्यवस्था ठेवणे हे पोलिसांचं मुख्य कर्तव्य आहे. पण, सध्या पोलीस नागरिकांना पाहिजे ती मदत करताना दिसत आहे. अशीच एक हृदयद्रावक मुंबईमधील विरारमध्ये समोर आली. या घटनेत खाकी वर्दितली माणुसकी पाहायला मिळाली आहे. या घटनेची दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील घेतली.


विरार पूर्वेकडील फुलपाडा इथे प्रमोद खारे (वय 45) यांचं तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल. मात्र, कोणीही नातेवाईक लॉकडाऊनमुळे येऊ न शकल्याने पोलीस नाईक सुभाष शिंदे यांनी स्वतः मृतदेहावर अंतिम संस्कार करून नातेवाईकांना व्हिडीओ कॉल करून दर्शन घडवलं. या घटनेवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस नाईक सुभाष शिंदे यांचा फोटो ट्विट करत महाराष्ट्र पोलिसांचा मला अभिमान असल्याचे लिहलं आहे.





अनिल देशमुख यांचे ट्विट
विरार येथे प्रमोद खारे यांचं दुःखद निधन झालं. ते घरी एकटेच होते. अशा प्रसंगी आमचे संवेदनशील पोलीस नाईक सुभाष शिंदे यांनी अंत्यसंस्काराची सर्व जबाबदारी पार पाडली.संकटाच्या वेळी नानाविध भूमिका निभावणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचा मला अभिमान आहे.


Coronavirus | कोरोना योद्धेच व्हायरसच्या विळख्यात, महाराष्ट्रातील 531 पोलीस कोरोनाबाधित


फुलपाडा इथले प्रमोद खारे हे घरी एकटेच असतात. त्यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. पण लॉकडाऊन असल्यामुळे त्यांचे नातेवाईक कोलकाता आणि दिल्लीवरून अंत्यसंस्कारासाठी येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही नव्हतं. मात्र, पोलीस नाईक सुभाष शिंदे यांनी मयत प्रमोद खरे यांचा बंद झालेला मोबाईल चार्ज करून नातेवाईकांशी संपर्क साधला. लॉकडाऊनमुळे नातेवाईकांना येण्यासाठी एक दिवस प्रेत राखून ठेवलं. मात्र, त्यांना येता आलं नाही. नातेवाईकांनी पोलीस सुभाष यांना अंतिम संस्कार करण्यास विनंती केली आणि अखेरच दर्शन व्हिडीओ कॉलद्वारे घेऊन साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.


Coronavirus | राज्यात सात पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू; गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया