मुंबई : 2013 मध्ये घडलेल्या प्रीती राठी अॅसिड हल्ल्याप्रकरणी अंकुर पनवार याला मुंबई सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अंकुरला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अॅसिड हल्ल्याप्रकरणी एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्याची ही देशातील पहिलीच घटना होती. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

नौदलाच्या रुग्णालयात नोकरीवर रुजू होण्यासाठी हरियाणाची प्रीती राठी दिल्लीहून 2 मे 2013 रोजी मुंबईत आली होती. गरीबरथ एक्स्प्रेसमधून वांद्रे टर्मिनस स्थानकात ती आपल्या कुटुंबियासह उतरत असताना तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या अंकुर पनवारने तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुनही प्रीतीचे प्राण वाचवण्यात त्यांना अपयश आले. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने अंकुर पनवारला सप्टेंबर 2016 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती.

प्रीतीवर अंकुरने अॅसिड हल्ला केला आणि त्यानंतर तो पुन्हा दिल्लीला फरार झाला. त्याने इतक्या सराईतपणे या हल्ल्याचं प्लानिंग केलं होतं, की अंकुरला अटक करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचला तब्बल नऊ महिने लागले. या काळात जवळपास 133 जणांना संशयित म्हणून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

वांद्रे टर्मिनसवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजचाही काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी याचिका प्रीतीच्या वडीलांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती.