मुंबई: मेट्रो 3 चं काम रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान करण्यास मुंबई हायकोर्टाने बंदी घातली आहे.

मेट्रो ३चं काम संपण्यास आता आणखी विलंब लागणार आहे, कारण मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाला रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत काम करण्यास बंदी घातली आहे. याबाबत दोन आठवड्यांनी यावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

रॉबिन जयसिंघानी या कुलाब्यात राहणा-या रहिवाशाने यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याचा आरोप आहे की, मेट्रोच्या कामामुळे तिथल्या रहिवाशांना प्रचंड त्रास होतो.

कुलाबा-कफ परेड हा भाग सीआरझेड अंतर्गत येत असल्यानं इथं विकास कामांवर अनेक मर्यादा आहेत. तसेच मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाकडून निवासी विभागातील ध्वनी प्रदूषणाच्या सर्व मर्यादा पायदळी तुडवल्या जात आहेत.

पोलिस आणि संबंधित यंत्रणेकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे ज्या दिवसापासून काम सुरू झालंय त्या दिवसापासून दररोज जो त्रास सहन केला जातोय त्यासाठी दिवसाला 10 हजार रूपये याप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

मेट्रो रेल प्राधिकरणानं आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय की, दिवसा हा संपूर्ण परिसर लोकांच्या गर्दीनं गजबजलेला असतो. त्यामुळे कॉंक्रिटीकरणाचं काम रात्रीच्या वेळेस करण्याशिवाय पर्याय नसतो. त्याचबरोबर हे काम करताना कुणाला जाणूनबूजून त्रास होणार नाही याची काळजीही घेतली जाते.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा मेट्रो तीनचा मार्ग आहे. 33.5 किमी अंतराचा हा मार्ग अंडरग्राऊंड अर्थात भुयारी आहे. या मार्गावर वेगाने काम सुरु आहे.  मात्र रात्रीच्या वेळी यंत्रांचा आवाज, त्यामुळे होणारा त्रास, यामुळे रॉबिन जयसिंगानी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

जयसिंगानी यांची मागणी ग्राह्य धरत, हायकोर्टाने रात्रीच्या वेळी होणारं काम थांबवण्याचे आदेश दिले.