मुंबई : उद्योजक रतन टाटा यांच्यासह टाटा समूहाच्या अन्य संचालकांविरोधात उद्योगपती नस्ली वाडिया यांनी दोन वर्षांपूर्वी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्याला स्थगिती देण्यास तूर्तास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.


वाडिया यांनी रतन टाटा यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा मुंबई दंडाधिकारी न्यायालयात दाखल केला आहे. या दाव्याची सुनावणी येत्या जुलैपासून दंडाधिकारी न्यायालयामध्ये होणार आहे. त्यापूर्वी या याचिकेवर सुनावणी होईल, असं बुधवारी न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी स्पष्ट केलं.


टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांना पदावरुन हटवण्याच्यावेळी टाटा ग्रुपच्या संबंधित संचालकांनी वाडिया यांच्याविरोधात काही वादग्रस्त विधाने केली होती, असा आरोप वाडिया यांनी या दाव्यामध्ये केला आहे.


या दाव्याची कारवाई डिसेंबर 2018 मध्ये सुरू झाली असून सर्व पक्षकारांना नोटीस बजावण्यात आली आहे. या दाव्याविरोधात टाटा यांनी ज्येष्ठ कायदेतज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी झाली असता कारवाईला स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी तूर्तास फेटाळण्यात आली आहे.