मुंबई : सयामी जुळ्यांसह गर्भवती असलेल्या महिलेला गर्भपाताची परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. वैद्यकीय अहवालाच्या आधारावर ही परवानगी नाकारत असल्याचं हायकोर्टाने स्पष्ट केलं. 'ही सयामी जुळी गर्भधारणा असली तरी गर्भाचा अवधी पूर्ण करणे, हेच आईसाठी सुरक्षित असेल,' असा वैद्यकीय अहवाल देण्यात आला आहे.

दक्षिण मुंबईत राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीने हायकोर्टात गर्भपातासाठी याचिका केली होती. मात्र जेजेतील डॉक्टरांनी दिलेल्या यासंदर्भात दिलोल्या अहवालानुसार संबंधित तरुणीच्या जीवला तूर्तास धोका नसून तिला गर्भाचा अवधी पूर्ण करण्यास देणे अधिक सुरक्षित ठरेल. मात्र तिला सयामी जुळी गर्भधारणा असून गर्भांना सामायिक -हदय आणि यकृत आहे. तसेच एका गर्भाच्या मेंदूमध्ये पाणी तयार होत असून अन्यही अनेक प्रकारच्या अवयववाढीमध्ये समस्या निर्माण होत आहेत.

गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार वीस आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यापुढील गर्भपातासाठी न्यायालयाची परवानगी बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित तरुणीने 30 आठवड्यांनंतर न्यायालयात याचिका केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निकालानुसार जन्माला येणाऱ्या बाळांचं पालकत्व राज्य सरकारने घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे संबंधित निर्देश या प्रकरणात लागू करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.