मुंबई | नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांना कोर्टाच्या आदेशांचा अवमान केल्याबद्दल हायकोर्टाकडून 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे. मशिदींवरील बेकायदेशीर भोग्यांबाबत आदेश देऊनही कारवाई का नाही? असा सवाल विचारत हायकोर्टानं शुक्रवारी ही नोटीस आयुक्तांना बजावली. २३ ऑक्टोबरपर्यंत या नोटिसीला उत्तर देण्याचे आदेशही आयुक्तांना देण्यात आलेत.
संतोष पाचलाग यांनी मशिदींवरील बेकायदेशीर भोग्यांविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठानं सविस्तर निकाल दिलेला आहे. त्यानुसार आदेशांची पूर्तता न झाल्यानं याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे.
रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी देऊ नका. प्रार्थनास्थळांवरीलही अवैध भोंगे काढा. ध्वनी प्रदूषणाविषयी जनजागृती करा. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करा, असे आदेश न्यायालयाने साल २०१६ मध्येच दिलेत. मात्र अजूनही त्यांची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी होत नसल्याबद्दल शुक्रवारी हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली.
वाढत्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1719 ध्वनी मापक यंत्रे घेऊन ती राज्यभरातील पोलीस ठाण्यांना दिली गेली आहेत. याद्वारे आवाज मोजून पोलीस संबंधितांवर कारवाई करतील, असे शासनाने त्यावेळी न्यायालयाला सांगितले होते.
कोर्टाच्या अवमानाप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
14 Sep 2018 06:28 PM (IST)
नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांना कोर्टाच्या आदेशांचा अवमान केल्याबद्दल हायकोर्टाकडून 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -