Kalyan's Ganpati Mandal : गणपतीचा देखावा हा समाजाला सामाजिक संदेश देण्याचं काम करणारा असावा. ते एखाद्यावर टिका करण्याचं किंवा कोणत्याही व्यक्तीचा अपमान करण्याचं माध्यम असू नये, अशा शब्दात हायकोर्टानं कल्याणमधील एका मंडळाला खडेबोल सुनावले आहेत. राज्यात सध्या सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारविरोधात उपहासात्मक टिप्पणी करत गणपतीचा देखावा उभारणा-या कल्याणमधील एका मंडळावर पोलीसांनी कारवाई केली होती. या कारवाईला गणेशोत्सव मंडळानं थेट मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्याची दखल घेत हायकोर्टानं शुक्रवारी या गणेशोत्सव मंडळाला आपला देखावा दाखविण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मात्र या देखाव्यातील काही आक्षेपार्ह शब्द आणि चित्र वगळण्याचेही निर्देशही दिले आहेत.  


कल्याणमधील 59 वर्ष जुन्या विजय तरूण मंडळानं यंता शिवसेनेतील बंडखोरीवर 'पन्नास खोके एकदम ओके' या संकल्पनेवर आधारित शिंदे फडणवीस सरकारवर उपहासात्मक भाष्य करणारा एक देखावा गणपती मंडपात साकारला आहे. त्यावर आक्षेप घेत पोलिसांनी पहाटे 3 च्या सुमारास मोठ्या फौजफाट्यासह कारवाई करत हा देखावा जप्त केला. याप्रकरणी मंडळाच्या विश्वस्तांविरोधात कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र पोलिसांच्या या कारवाईविरोधात मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या कारावईनं घटनेनं आम्हाला दिलेले अधिकार हिरावून घेतले जात असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता. या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.


या सुनावणीदरम्यान, हायकोर्टानं पोलिसांची चागलीच कान उघडणी केली. गणपतीच्या चलचित्रामध्ये फोटोंचा वापर केल्यानं कोणता गुन्हा होतो? अशा शब्दांत फोटोवर आक्षेप घेणाऱ्या पोलिसांना हायकोर्टानं जाब विचाराला. तसेच गणपती देखावा हा समाजाला सामाजिक संदेश देण्याचे काम करतो कोणत्याही व्यक्तींचा अपमान करत नाही, अशा शब्दांत मंडळाचीही कानउघडणी केली. दोन्ही बाजू ऐकून घेत हायकोर्टानं विजय तरूण मंडळाला अटीशर्तींसह हा देखावा दाखविण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो वापरण्यास परवानगी दिली. मात्र, देखाव्यातील काही आक्षेपार्ह शब्द, चित्र, फोटो देखाव्यात न लावण्याचे आदेशही या मंडळाला दिले आहेत.


आणखी वाचा :
Kalyan News :  राजकीय देखाव्यावर पोलिसांची कारवाई, कारवाई विरोधात मंडळाची न्यायालयात धाव