मुंबई : शर्जिल उस्मानी हा तपासात सहकार्य करत असून त्याची चौकशी अद्याप पूर्ण झाली नसल्याचं पुणे पोलिसांनी सोमवारी हायकोर्टात सांगितलं. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत त्याच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नका, असे निर्देश पुणे पोलिसांना देत या प्रकरणाची सुनावणी 22 मार्चपर्यंत तहकूब केली. आणि शर्जिल उस्मानीला येत्या गुरूवारी 18 मार्चला पुन्हा एकदा चौकशीसाठी स्वारगेट पोलीस स्थानकांत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी पार पडली.


'माझ्या भाषणातील मुद्दे वेगवेगळ्या पद्धतीने मांडून उगाच गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न होत आहे', असा आरोप उस्मानीनं या याचिकेतून केला आहे. समाजातील सद्य परिस्थितीबाबत आपण शांततापूर्ण पद्धती विविध मुद्दे मांडले होते. ते मांडताना या सामाजिक समस्यांवर भाष्य करण्यात आलं होतं. त्यासाठी काही रोखठोक दाखले दिले जेणेकरून उपस्थितांना या समस्यांची जाणीव होईल, असा दावाही त्यानं याचिकेतून केला आहे.


पुण्यातील स्वारगेट पोलीस स्थानकांत उस्मानीविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिव प्रदीप गावडे यांनी तक्रार दाखल केली आहे. चिथावणीखोर भाषण करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रत्येक केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीच्या आधारे पुणे पोलिसांनी शर्जिल उस्मानीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र हा आरोप निराधार असून असा कोणताही प्रकार झालेला नाही. तसा कोणताही प्रयत्न आपण केला नाही, उलट असा आरोप करून आता समाजात जातीय तेढ निर्माण केली जात आहे, असा दावा उस्मानीनं केला आहे. शर्जिल उस्मानी हा अलीगड मुस्लिम विद्यापीठचा माजी विद्यार्थी आहे. केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध करणाऱ्या अनेक रॅली आणि जाहीर सभांमध्ये शर्जिल उस्मानी याला स्टार प्रचारक म्हणून भाषणासाठी आमंत्रित केलं जातं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :