Maharashtra MP Navneet Rana Discharged from Hospital : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताना नवनीत यांच्या हातात हनुमान चालिसा दिसली. एवढंच नाहीतर रुग्णालयाबाहेर नवनीत राणा यांच्या स्वागतासाठी काही समर्थक उपस्थित होते. समर्थकांकडून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना हनुमानाची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. तसेच, श्रीरामाचं नाव असलेली शाल पांघरून नवनीत राणा यांचं समर्थकांकडून स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. 



"मी अशी कोणती चूक केली? प्रभू श्रीरामाचं नाव घेणं, हनुमंताचं नाव घेणं चूक असेल, तर 14 दिवस काय? मी 14 वर्ष शिक्षा भोगायला तयार आहे. 14 दिवसंच काय, 14 वर्ष जरी जेलमध्ये टाकलं तरी माझा आवाज तुम्ही दाबू शकत नाही.", असं त्या म्हणाल्या. महाविकास आघाडीत सत्तेचा गैरवापर होत असल्याची तक्रार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे दिल्लीत करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं आहे. तसेच, दिल्लीत जाऊन संजय राऊतांचीही तक्रार करणार आहे, असंही त्या म्हणाल्या. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांनी थेट आव्हान दिलंय. महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात निवडणूक लढवावी, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढीन, असं राणा म्हणाल्या आहेत. एवढंच नाहीतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं आहे. 


दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणासाठी राणा दाम्पत्य मुंबईत धडकलं आणि त्यानंतर झालेल्या नाट्यानंतर नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना अटक करण्यात आली. 12 दिवस तुरुंगात काढल्यानंतर नवनीत राणा यांची गुरुवारी जामिनावर सुटका झाली आणि त्याच दिवशी त्या रुग्णालयात दाखल झाल्या. कारागृहात योग्य वागणूक न मिळाल्यानं प्रकृती बिघडल्याचा आरोप नवनीत राणांनी केला आहे. अनेक भाजप नेत्यांनी रुग्णालयात जाऊन नवनीत राणांची भेट घेतली. काल (शनिवारी) देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी देखील नवनीत राणांची लीलावती रुग्णालयात भेट घेतली. आज डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा नवनीत राणा यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे. ज्या प्रकरणी राणांना अटक करण्यात आली आहे. त्या प्रकरणावर माध्यमांशी बोलण्यास कोर्टानं मनाई केली आहे. याच अटीवर त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :