मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सेना-भाजपमधील दुरावा वाढत चालला आहे. आज मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी त्यांना उत्तर दिलं आहे. "काही जणांच्या सवयीचा गुण जात नाही," असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा विषय मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा केल्याने शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपाटले आहेत. प्रकल्पग्रस्तांना काल मातोश्रीवर आमंत्रित करुन उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महामार्गासाठी तुमच्या सुपिक जमिनी जाऊ देणार नाही, असे आश्वासन देऊन तुमचा विरोध कायम ठेवा, शिवसेना तुमच्या पाठीशी असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं.

तसंच "पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आम्हाला आमच्या विकासाच्या कामांपासून कुणीही परावृत्त करु शकत नाही," असंही शेलारांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं विकास निर्माण रथ तयार केला आहे. या रथाच्या माध्यमातून फडणवीस सरकारची 2 वर्षातील कामगिरी मुंबईकरांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या विकास रथाचं उद्घाटन केलं. त्यावेळी आशिष शेलारांनी हे वक्तव्य केलं आहे.

युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनीही शेलारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ठाणे महापालिकेच्या जस्ट प्ले संकल्पनेची घोषणा करण्यात आली. त्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलते होते. या साऱ्या वादात सेना भाजपमधील दुफळी वाढत चालली आहे असंच चित्र दिसू लागलं आहे.