डोंबिवली : डोंबिवली आणि ठाण्यात उद्या साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडवा सणाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. डोंबिवली, ठाण्यात भव्य रांगोळ्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाय बाजारपेठांमध्येही गुढीच्या साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे.
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी डोंबिवलीकर दरवर्षीप्रमाणे सज्ज झाले आहेत. बाजारपेठेत गर्दी वाढल्यानं व्यापारी वर्गातही उत्साह आहे. गुढी उभारण्यासोबतच दाराला तोरण लावून नववर्षाचं स्वागत केलं जातं. त्यामुळं पारंपरिक झेंडूच्या फुलांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
फुलं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. शिवाय तोरणं, श्रीखंड यांची खरेदीही जोरात आहे.
गुढीपाडव्याच्या निमित्तानं ठाण्यामध्ये तब्बल 18 हजार स्क्वेअर फूटांची रांगोळी साकारण्यात आली आहे. शहरातल्या गावदेवी मैदानावर ही रांगोळी साकारण्यात आली आहे. इथल्या रंगवल्ली परिवारातल्या तब्बल 70 कलाकारांनी मिळून 9 तासात या रांगोळीला मूर्त स्वरुप दिलं आहे.
ही कलाकृती बनवण्यासाठी तब्बल 900 किलो रांगोळी आणि विविध रंग लागले. येते 3 दिवस ठाणेकर ही रांगोळी पाहू शकतात. गेल्या 17 वर्षांपासून रंगवल्ली परिवार या संस्थेनं ही कला जपली आहे.