मुंबई : दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड स्थानकाजवळ असलेल्या पुलाला तडे गेले आहेत. हा पूल ग्रँट रोड आणि नाना चौकला जोडणारा आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी वाहतूक अन्य मार्गांद्वारे वळवली आहे. काल रात्रीच पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आला आणि यावर लगेचच सुरक्षेच्या दृष्टीने हा पूल बंद करण्यात आला . या प्रकरणी महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपासणीनंतरच पुलाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

मुंबई पोलिसांनीआपल्या  ट्विटर हँडलद्वारे या घटनेची माहिती दिली. या ट्विटमध्ये पोलिसांनी 'ग्रँट रोड स्थानकाजवळ असलेल्या पुलाला तडे  गेले आहे. तरी खबरदारी म्हणून वाहतूक केनेडी पुलावरुन वळवण्यात आली असल्याचे सांगितले'.


या भागात मुंबई महानगर पालिकेचे ‘डी’ विभाग कार्यालय तर अग्निशमन दलाचे कार्यालय हाकेच्या अंतरावरच आहे. येथून दक्षिण मुंबईतील सर्व महत्वाच्या ठिकाणी जाता येते. या घटनेचा परिणाम दक्षिण मुंबईतील रस्ते वाहतुकीवर होऊ शकतो. याची खबरदारी म्हणून पोलिसांनी वाहतुक केनेडी पुलावरुन वळवली असून रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम होऊ नये म्हणून खबरदारी घेतली आहे.

कालच पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनच्या विलेपार्ले एंडच्या बाजूला असलेला प्लॅटफॉर्म क्र. 8 आणि 9 च्या दरम्यान पुलाचा फुटपाथ कोसळल्यामुळे रेल्वेची वाहतुक ठप्प झाली होती. या घटनेला एक दिवसही उलटत नाही तोवर ग्रँट रोड स्थानकाजवळील पुलाला तडे गेले आहेत.