मुंबई : 'आज रात्री 8 पर्यंत कामावर रुजू व्हा, नाहीतर सहा महिन्यांचा पगार कापला जाईल,' असा निर्वाणीचा इशारा राज्य सरकारने मार्डच्या डॉक्टरांना दिला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज सामूहिक रजेवर असलेल्या सर्व डॉक्टरांना तंबी दिली आहे.

निवासी डॉक्टरांनी कामावर यावं, रुग्णाचे हाल होत आहे. त्यांच्या जीवाशी आम्ही खेळू शकत नाही. सुरक्षा पुरवण्याचं लेखी आश्वासनं दिलं आहे. तसंच सुरक्षेची मागणी एका महिन्यात पूर्ण करु असं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने कामावर रुजू व्हावं, असं गिरीश महाजन म्हणाले.

दरम्यान, डॉक्टरांच्या सामूहिक रजेविरोधात आता कारवाईला सुरुवात झाली आहे. नागपूरच्या सरकारी रुग्णालयातील 370 डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे. तर सोलापुरात 114 डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत रजेवर गेलेल्या डॉक्टरांना नोंदणी रद्द करण्याची ताकीद देण्यात आली आहे. तर पुण्यातील 200 डॉक्टरांना नोटीस धाडण्यात आली आहे. बेकायदेशीररित्या सामूहिक रजेत सहभागी झाल्याचा ठपका डॉक्टरांवर ठेवण्यात आला आहे.

हायकोर्टाने खडसावूनही पुण्याच्या ससून रुग्णालयात अजूनही 200 डॉक्टर सामूहिक रजेवर आहेत. तर मुंबईत सामूहिक रजेवर गेलेल्या डॉक्टरांना आरोग्य विभागाच्या संचालकांनी नोटीस बजावली. कामावर रुजू न झाल्यास डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.

न्यायालयाने डॉक्टरांना खडसावलं
मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने संपकरी निवासी डॉक्टरांना फटकारलं. एखाद्या कामगाराप्रमाणे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जर डॉक्टर संपाचं हत्यार उपसत असेल तर त्यांचं वर्तन हे डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारं आहे, असं निरीक्षण मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चिल्लोळ यांनी नोंदवलं.

काय आहे प्रकरण?
सायन रुग्णालयातील डॉक्टर रोहित कुमार यांना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकाडून मारहाण करण्यात आली. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या घटनेचा निषेध म्हणून रविवार संध्याकाळपासून सायनसह नायर आणि केईएम रुग्णालयातील रुग्णसेवा बंद आहे. या रुग्णालयात सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहे.

आज सकाळपासून राज्यभरातल्या सर्व निवासी डॉक्टरांनी बंद पुकारल्यानं रुग्णसेवा ठप्प पडली आहे.

मार्डच्या डॉक्टरांच्या नेमक्या मागण्या काय?
– डॉक्टरांवरील हल्ले टळण्यासाठी डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट 2010ची परिणामकारक अंमलबजावणी करा
– डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी
– निवासी डॉक्टरांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा
– सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावा

संबंधित बातम्या

नागपूरचे 370, सोलापूरचे 114 डॉक्टर निलंबित

हायकोर्टाच्या ताशेऱ्यानंतरही मुंबईतील डॉक्टर रजेवर

मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा : हायकोर्ट

डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा दुसरा दिवस, संपाविरोधात हायकोर्टात सुनावणी

राज्यभरातील डॉक्टर रजेवर, रुग्णांचे हाल

सायन रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण

धुळ्याच्या मारहाणीविरोधातला निवासी डॉक्टरांचा संप मागे

इंजिनिअरच व्हायला हवं होतं, धुळ्याच्या ‘त्या’ डॉक्टरची हतबलता

धुळे डॉक्टर मारहाण : संशयित आरोपीचा पोलिस कोठडीत गळफास

धुळ्यात जबर मारहाणीत डॉक्टरचा डोळा निकामी होण्याची भीती