मुंबई : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे. मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये असलेल्या 'सरदारगृह'मध्ये टिळकांनी 1 ऑगस्ट 1920 साली अखेरचा श्वास घेतला. ज्या ठिकाणी लोकमान्य टिळक राहिले, ज्या ठिकाणी बसून त्यांनी जुलमी इंग्रजी राजवटीविरोधात विविध योजना आखल्या, त्या जागेची दुर्दशा पाहून सरकारला लोकमान्य टिळकांचा विसर पडला आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

एकीकडे अनेक नेते, महात्मा यांच्या स्मारकांसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जात असताना दुसऱ्या बाजूला लोकमान्य टिळकांच्या या स्मारकाची अशी अवस्था का? असा प्रश्न ज्येष्ठ विचारवंत सुधींद्र कुलकर्णी यांनी पत्राद्वारे सरकारला विचारला होता. त्यावर सरकारकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. तसेच या ठिकाणी टिळकांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं, अशी मागणी 2 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. तरीसुद्धा परिस्थिती जैसे थे आहे.

'सरदार गृहा'च्या चौथ्या मजल्यावर असलेल्या 'केसरी' या घरात लोकमान्य टिळक वास्तव्यास होते. मुंबईत त्यांना अनेक मोठे नेते या ठिकाणी भेटायला यायचे. अगदी महात्मा गांधींपासून मोहम्मद अली जिनादेखील या ठिकाणी टिळकांना भेटायला यायचे. अनेक महात्त्वाच्या घडामोडी या सरदार गुहाच्या 'केसरी'मध्ये घडल्या. तरीसुद्धा या ठिकाणी कोणताही विकास झालेला पाहायला मिळत नाही. ही एक प्रकारची टिळकांची उपेक्षा असल्याचे अनेक टिळक प्रेमींचे मत आहे.

जमिनीच्या वादामुळे सरदार गृहाचा विकास रखडला असल्याचे तेथील स्थानिकांचा म्हणणे आहे. मात्र, ज्या व्यक्तीने स्वराज्यासाठी आयुष्य व्यतीत केलं, त्यांच्या स्मारकासाठी सरकार कोणतेही पाऊल उचलत नसल्याचे आणि मतांच्या राजकारणात सरकार व्यस्त असल्याचे सुधींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

टिळकांचे हे स्मारक राष्ट्रीय स्मारक व्हावे, ही अनेक टिळकप्रेमींची इच्छा आहे. सरकार याकडे कधी लक्ष देणार? या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरीत आहे