Mumbai Local Western Railway मुंबई: बोरिवली ते विरार या पश्चिम रेल्वे मार्गावर (Western Railway) पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेला मुंबई उच्च न्यायालयानं हिरवा कंदील दिला आहे. या कामासाठी 2 हजार 612 तिवरांची झाडं तोडण्यासही हायकोर्टानं परवानगी दिलीय. ही परवानगी देताना नव्या रेल्वे मार्गिकेमुळे इंधनाची बचत होत प्रदूषणाला आळा बसेल असं निरीक्षण मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठानं नोंदवलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
एमयूटीपी अंतर्गत बोरिवली आणि विरार दरम्यान पाचवा आणि सहावा रेल्वे मार्ग 2 हजार 184 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. 26 किमी लांबीच्या या मार्गामुळे लोकलची संख्या वाढणार आहे. सध्या मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान पाच मार्गिका आहेत आणि सहाव्या मार्गाचं काम सुरू आहे. तर बोरिवली ते विरार यादरम्यान चारच मार्गिका आहेत. या प्रकल्पाच्या आड कांदळवन येत असल्यानं ती तोडण्याची परवानगी मिळावी यासाठी पश्चिम रेल्वेच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर राखून ठेवलेला निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
हायकोर्टाचं निरिक्षण काय?
- रेल्वे हा वाहतुकीच्या दृष्टीनं एक पर्यावरणपूरक व कार्यक्षम व्यवस्था आहे.
- या मार्गामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणीत कमी होईल.
- या रेल्वे मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि इंधनाचीही बचत होईल.
- हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणं आवश्यक असून अस्तित्त्वात असलेल्या ट्रॅकला लागूनच नवा प्रकल्प उभा राहणार आहे.
- पर्यावरणाचं होणारं नुकसान भरून काढण्यासाठी रेल्वे प्रशासन 7 हजार 823 खारफुटींचं पुनर्रोपण करणार आहे.
पश्चिम रेल्वेवर 35 दिवसांचा मेगाब्लॉक-
गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सहावी मार्गिका तयार करण्यासाठी 27 ऑगस्ट ते 6 ऑक्टोबर या कालावधीत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना विस्कळीत वेळापत्रकाला सामोरे जावे लागणार आहे. गोरेगाव-कांदिवली विभाग हा वांद्रे टर्मिनस आणि बोरिवली दरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गाचा भाग आहे. वांद्रे टर्मिनस-बोरिवलीदरम्यान (Mumbai Local) पाचवी मार्गिका आणि खार रोड-गोरेगावदरम्यान सहावी मार्गिका सुरु झाली आहे. आता गोरेगाव कांदिवलीदरम्यान 4.5 किमी लांबीच्या सहाव्या मार्गाचे काम सुरु होणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान जवळपास 66 ते 700 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान गणेशोत्सव असल्याने 11 ते 17 सप्टेंबर या कालावधीत मार्गिकेचे काम करण्यात येणार नाही, असं रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. तसेच प्रत्येक ब्लॉकमध्ये केवळ 130-140 गाड्या रद्द करण्यात येणार आहे. मेगाब्लॉकचा कालावधी सुरू झाल्यानंतर पाचव्या, 12 व्या, 19 व्या, 26 व्या आणि 33 व्या दिवशी हे ब्लॉक घेतले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाचे दिली.
संबंधित बातमी:
मोठी बातमी: पश्चिम रेल्वेवर आजपासून 35 दिवसांचा मेगाब्लॉक; 600 ते 700 लोकल फेऱ्या रद्द होणार