कल्याण  :कल्याण डोंबिवलीतील नागरिक आणि व्यापारी वर्गासाठी अत्यंत आनंदाची तसेच महत्वाची बातमी आहे. कोविड रुग्णांच्या कमी होणाऱ्या संख्येमुळे अखेर केडीएमसीचा कोविड निर्बंधांच्या लेव्हल 3 मधून लेव्हल 2 मध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे इथले निर्बंध आणखी शिथिल झाले असून येत्या 21 जूनपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी याबाबत नविन आदेश जारी केले आहेत. 


गेल्या 2 आठवड्यांपासून केडीएमसी क्षेत्रातील कोविड रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे. मात्र निर्बंध शिथिल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निकषांच्या बॉर्डरवर केडीएमसी येत असल्याने गेले 2 आठवडे लेव्हल 3 मध्ये समावेश झाला होता. मात्र 21 जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यासाठी केडीएमसीने नवीन शिथील झालेले निर्बंध जारी करत लेव्हल 2 मध्ये समावेश झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता केडीएमसी क्षेत्रात येत्या 21 जून पासून नविन शिथिल झालेले निर्बंध लागू होणार असून ए 27 जूनपर्यंत लागू असणार आहेत.


काय सुरु काय बंद 


दुकाने आणि अत्यावश्यक सेवेतील आस्थापना नियमितपणे सुरू राहणार 
अत्यावश्यक सेवेत नसलेली कार्यालयेही नियमितपणे सुरू करता येणार
मॉल्स, थिएटर, (मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन) 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी
रेस्टॉरंटही 50 टक्के आसन क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी
लोकल ट्रेन केवळ अत्यावश्यक आणि वैद्यकीय सेवेसाठी खुली
सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे, सायकलिंग नियमित सुरू
खासगी कार्यालये संपूर्ण खुली ठेवण्यास मान्यता
लग्नसमारंभ हॉलच्या 50 टक्के क्षमतेने किंवा जास्तीत जास्त 100 व्यक्तींना परवानगी
अंत्यविधीसाठी उपस्थितीचे कोणतेही बंधन नाही
जमावबंदी लागू असणार


हे निर्णय 21 जूनपासून 27 जूनपर्यंत लागू राहणार असल्याचे केडीएमसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


 


कल्याण डोंबिवलीत आज शून्य मृत्यूची नोंद 
संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये मुंबईपाठोपाठ कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या आणि मुंबई ठाण्यातील निर्बध हटविल्यानंतरही मागील दोन आठवडे  निर्बंधात काढणाऱ्या कल्याण डोंबिवली मधील रुग्णसंख्या कमी होत आहे. तसेच उपचाराधीन रुग्णसंख्या घटत आहे त्यातच आज पालिका क्षेत्रात कोरोनाने एकही बळी घेतला नसल्याचे समाधानकारक चित्र आहे. 12 मार्चनंतर प्रथमच शून्य मृत्यूची नोंद झाली असून यापुढे कोरोनामुळे एकही व्यक्तीचा बळी जाऊ नये अशी प्रार्थना नागरिक करत आहेत.


मागील वर्षभरात करोना काळात नागरिकांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे.  11 मार्च 2020 ला कल्याण डोंबिवलीमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. तर 4 एप्रिल 2020 ला पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद झाली होती. यानंतर जून, जुलै आणि 2021 च्या मार्च ते मे  महिन्यात कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाने  कळस गाठला होता. दुसऱ्या लाटेत एकीकडे दिवसाला सापडणाऱ्या रुग्णाची संख्या 2400 वर पोहोचली तर कोरोना बळीचा आकडा दिवसाला 24 पर्यंत गेल्याने नागरिक भयभीत झाले होते. दुसऱ्या लाटेत करोनाने जवळपास 700 नागरिकांचा जीव घेतला होता. मागील वर्षात दररोज बळी घेणाऱ्या कोरोनाच्या नोंदीत 5 जानेवारी आणि 12 मार्च रोजी शून्य मृत्यूची नोंद झाली होती. तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दिवसाला किमान 20 नागरिकांच्या मृत्यूची नोंद होत होती. मात्र आज शून्य मृत्यूची नोंद आणि दुसरीकडे 80 च्या आत नवे रुग्ण हे चित्र कल्याण डोंबिवली शहरासाठी समाधानकारक असून हे चित्र कायम राहावे यासाठी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे