मुंबईः मुंबईतील एका ट्यूटर अकॅडमीने विद्यार्थीनीला शिकवण्यास दिरंगाई केल्यामुळे ग्राहक न्यायालयाने अकॅडमीला 3 लाखांचा दंड ठोठावला आहे. अकॅडमीने मान्य केलेल्या सेवा विद्यार्थीनीला पुरवू शकली नाही, त्यामुळे विद्यार्थीनीचं नुकसान झालं, अशी तक्रार मुलीच्या आईने ग्राहक न्यायालयात केली होती. त्यानंतर न्यायालयाने हा दंड ठोठावला.
ग्राहक न्यायालयाने 3 लाख रुपये दंड तर 54 हजार रुपये क्लासची फी परत करण्याचे आदेश अकॅडमीला दिले आहेत. सोबतच 10 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत.
अकॅडमीकडून विद्यार्थीनीची फसवणूक
अभिव्यक्ती वर्मा या विद्यार्थीनीने 2013 साली अंधेरी येथील ऑक्स्फर्ड ट्युटोरिअल अकॅडमीकडे 12 वी सायन्सच्या परीक्षांसाठी शिकवणी सुरु केली होती. सुरुवातीला अनुभवी प्राध्यापक असल्याचा दावा ऑक्स्फर्डने केला होता.
फोटो सौजन्य : मिड-डे
पण अकॅडमीने एक महिन्यासाठी केमिस्ट्रीचा प्राध्यापकच शिकवणीसाठी घरी पाठवला नाही. तसेच गणिताचे प्राध्यापक हिंदी माध्यमाचे होते, अभिव्यक्ती ही इंग्रजी माध्यमाची विद्यार्थीनी होती, त्यामुळे तिला गणिताच्या शिकवणीचाही फायदा झाला नाही.
अभिव्यक्तीच्या आईने वारंवार केमिस्ट्री विषयाच्या प्राध्यापकांची मागणी केली. पण त्यानंतर अकॅडमीने आठवी इयत्तेला शिकवणाऱ्या शिक्षकाला शिकवणीसाठी घरी पाठवलं. त्यामुळे अभिव्यक्तीचा अभ्यास होऊ शकला नाही, असं व्यवसायाने वकिल असलेल्या अभिव्यक्तीच्या आई टीना वर्मा यांनी सांगितलं.
आपल्या मुलीचा अभ्यास होत नसल्याचं पाहून टीना यांनी पुन्हा एकदा अकॅडमीकडे संपर्क साधला. त्यानंतर अकॅडमीने प्रश्नपत्रिका सोडवायला मदत करण्यासाठी एक आयआयटीचा विद्यार्थी पाठवला, असं टीना यांनी सांगितलं.
परिणामी दहावीमध्ये 83 टक्के घेणारी अभिव्यक्ती 12 वी सायन्स शाखेत 60 टक्के सुद्धा मिळवण्यास अपयशी ठरली. ज्यामुळे हैदराबादच्या एका महाविद्यालयात तिला प्रवेश मिळवता आला नाही.
टीना यांनी 2015 मध्ये अकॅडमीच्या विरोधात स्वतः मार्फत तक्रार दाखल केली होती.
अपयशाला अकॅडमीच जबाबदार, विद्यार्थीनीचा आरोप
ऑक्स्फर्ड अकॅडमीने शिकवण्यास अगोदरपासूनच दिरंगाई केली. अभिव्यक्तीचा केमिस्ट्रीचा अभ्यास अगोदरच चांगला नव्हता, त्यातच केमिस्ट्रीला नियमित प्राध्यपकही मिळाला नाही. जे प्राध्यापक होते ते अत्यंत धीम्या गतीने शिकवत होते. अभ्यास न झाल्यामुळे मी उदासीन झाले. माझ्या वडीलांनी मदत केल्यामुळे केमिस्ट्रीचा थोडाफार अभ्यास होऊ शकला. त्यामुळे माझ्या अपयशाला अकॅडमीच जबाबदार आहे, असं अभिव्यक्तीने मिड-डे या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.
फोटो सौजन्य : मिड-डे
विद्यार्थीनी अभ्यासात संथ असल्याने कमी गुण, अकॅडमीचा आरोप
दरम्यान अकॅडमीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ऑक्स्फर्डकडे अनुभवी प्राध्यापक आहेत. अभिव्यक्ती आमच्यासोबतच दुसऱ्या क्लासेसचीही शिकवणी घेत होती. त्यामुळे अभ्यास करताना तिचा गोंधळ उडत होता. अकॅडमीने 285 तासांची सेवा असताना 350 तासांची सेवा दिली आहे.
या उलट अभिव्यक्ती दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करत नसल्याच्या तक्रारीही घरी पाठवलेले प्राध्यापक करत असत. आमच्यावतीने आम्ही सर्व सेवा पुरवल्या, पण विद्यार्थीनी अभ्यासात संथ असल्याने तिला अपेक्षित अभ्यास करता आला नाही, असा दावा ऑक्स्फर्ड अकॅडमीच्या काऊन्सलर दीक्षा वर्मा यांनी केला आहे.