मुंबई : मुंबईतील मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा विचारण्याची वेळ आली आहे. कारण, हिंगणघाट आणि औरंगाबादेतील सिल्लोडमधील जळीतकांडाच्या घटना ताज्या असतानाच आता माटुंगा रेल्वे स्थानकातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दादर-माटुंगा या रेल्वे पुलावर एका विकृताने मुलीसोबत छेडछाड केली. हा किळसवाणा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या विकृताला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.


ही घटना 25 जानेवारी 2020 रोजी माटुंगा स्टेशनवर संध्याकाळी 7.52 वाजता घडली. तरुणी पुलावरुन जात असताना विकृत तिच्या मागून आला आणि तिची छेडछाड करुन तिथून पळ काढला. आपल्यासोबत नेमकं काय घडलं हे तरुणीला समजलंच नाही. हतबल झालेली ती मुलगी तिथून निघून गेली.



हा विकृत एवढ्यावरच थांबला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी 2020 रोजी दोन महिला आपसात बोलत होत्या. तेव्हा हाच विकृत तरुण समोरुन आला आणि त्या महिलांचीही छेड काढून तिथून पळून गेला. दोन्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसणारा आरोपी एकच आहे. याची तोंडी तक्रार रेल्वे पोलिसांकडे करण्यात आली होती. त्याच्यानंतर सापळा रचून रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिसांनी चौकशी सुरु केली असता या आरोपीविरुद्ध आधीच चोरी आणि छेडछाडीचे आरोप असल्याचं समोर आलं आहे. आरोपी हा सुतार करणारा असून मुंबईतील अँटॉप हिल इथे राहतो. त्याचं कुटुंब उत्तर प्रदेशात असून तो मुंबईमध्ये  एकटाच राहतो.


या आरोपीला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र विनयभंगाच्या प्रकरणात अधिकृत तक्रार नसल्यामुळे त्याला जामीन मिळाला आहे. रेल्वे पोलिसांनी महिलांना आव्हान केलं आहे की, "ज्यांच्यासोबत ही अशी घटना घडली असेल त्यांनी तक्रार करावी जेणेकरुन अशा गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळेल."


दरम्यान, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असल्या तरी वारंवार अशा घटना घडत असल्याने मुंबईत शिक्षणासाठी, कामासाठी बाहेर पडणाऱ्या महिला आणि मुली सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.