मुंबई : पुण्यात शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पासाठी आठ हजार 313 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात केंद्र सरकार एक हजार 137 कोटी रुपये, तर राज्य सरकारचा वाटा एक हजार 812 कोटी रुपये असणार आहे.


गिरीश बापटांनी सांगितलं की, “शिवाजीनगर ते हिंजवडी 23.5 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी आठ हजार 313 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील केंद्र सरकारकडून एक हजार 137 कोटी रुपये मिळणार आहेत. तर राज्य सरकार यासाठी एक हजार 812 कोटी खर्च करेल.”

एकूण 23.5 किलोमीटरच्या या मेट्रो प्रकल्पात 23 स्थानके उभारली जाणार आहेत. ही स्थानके प्रत्येकी एक किलोमीटर अंतरावर उभारली जातील. तसेच सुरुवातीला 10 मिनिटाच्या अंतराने मेट्रो धावणार असल्याची माहिती बापट यांनी दिली.

या मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडसाठी एकूण 25 हेक्टर जमीन लागणार आहे. तर 18 ते 20 हेक्टर जागा एमआयडीसीची जागा लागणार आहे. तसेच या मेट्रो प्रकल्पाचा फायदा दोन ते अडीच लाख लोकांना होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. शिवाय 48 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.