ठाणे : सध्या संपूर्ण पूर्व द्रुतगती मार्गापासून ते घोडबंदर रस्त्यापर्यंत मेट्रोचे काम सुरू असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होते आहे. यावर उपाय म्हणून बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडचा वापर करता येऊ शकतो. मात्र या मार्गावर 4 ठिकाणी संजय गांधी उद्यानाच्या हद्दीतील जागा असल्याने हे सर्विस रोड पूर्ण करण्यास अडथळा येत होता. आता मात्र वनविभाग ही जागा ठाणे महानगरपालिकेत देण्यास तयार झाला असून लवकरच या चार ठिकाणी देखील सर्विस रोड बांधून वाहतूक कोंडी सुटेल असं शिवसेना खासदार राजन विचारे यांनी सांगितले.


ठाणे शहरातील वाढते शहरीकरण व घोडबंदर परिसरात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने पूर्वदुती महामार्गाच्या शेजारी सर्विस रोड मार्ग बांधले. मात्र तीन हात नाक्यापासून ते गायमुखपर्यंत असलेल्या सर्विस रोडमधील चार ठिकाणी वन विभागाची जागा आहे. ही जागा हस्तांतरित करण्यासाठी गेल्या अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते. मात्र ती हस्तांतरीत न झाल्याने आणि परवानगी न मिळाल्याने ही कामे अनेक वर्षापासून रखडलेली होती. हा अडथळा दूर करण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य वनसंरक्षक आणि महापालिका आयुक्त यांच्यासोबत बैठक घेतली होती.


त्याच अनुषंगाने आज खासदार राजन विचारे यांनी प्रत्यक्ष जागांची पाहणी केली. वनविभागाच्या या जागेमुळे आणि मेट्रोच्या सुरू झालेल्या कामांमुळे पातलीपाडा ते गायमुख या केवळ सात किलोमीटरच्या अंतरासाठी तब्बल दीड ते दोन तास वाहनचालकांना खर्च करावे लागतात. गेल्या तीन वर्षात या मार्गावर 500 हून अधिक अपघात झाले असून 150 अपघाती मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळेच या जागा अधिग्रहीत करून सर्विस रोड पूर्ण करणे अत्यंत आवश्यक बनले होते.


आज झालेल्या पाहणी दौऱ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे या परिक्षेत्रातील वनाधिकारी राजेंद्र पवार यांनी हे काम सुरू करण्यास अनुकूलता दर्शवली आणि लवकरच महापालिकेला काम सुरू करण्यास आम्ही परवानगी देऊ असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले. आजच्या दौर्‍यात महापालिका अधिकारी आणि ठाण्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील देखील उपस्थित होते. यावेळी उर्वरित सर्विस रोडवरील खड्डे बुजवून डागडुजी करण्याचे आदेश राजन विचारे यांनी दिले.