दुर्घटनाग्रस्त व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी-90 हे चार्टर्ड विमान यूपी सरकारचं खासगी विमान होतं. मात्र हे विमान 2014 मध्ये यूपी सरकारकडून यूवाय एव्हिएशन या कंपनीने विकत घेतलं होतं.
या कंपनीच्या विमानाचा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी 7 जुलै 2017 रोजी अलिबागमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची जी दुर्घटना घडली होती, ते हेलिकॉप्टरही याच कंपनीचं होतं.
1995 साली तयार करण्यात आलेल्या VT-UPB — a Bell 230 हे हेलिकॉप्टर यूवाय कंपनीने उत्तर प्रदेशकडून विकत घेतलं होतं. अलिबागमध्ये त्यावेळी मोठी दुर्घटना टळली होती.
अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं?
रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथे मुख्यमंत्री 7 जुलै 2017 रोजी एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी हेलिकॉप्टरचा पंखा त्यांच्या डोक्याला लागत होता. मात्र उपस्थित सुरक्षा रक्षक आणि अधिकाऱ्यांनी प्रसंगावाधन दाखवल्याने मोठा अनर्थ टळला.
अलिबाग इथं शेकाप आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळा होता. हा सोहळा संपल्यानंतर डोलवी-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी 1.55 वाजण्याच्या सुमारास, मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी निघाले.
ते हेलिकॉप्टरमध्ये चढत असतानाच हेलिकॉप्टरने टेक ऑफ अर्थात उड्डाणास सुरुवात केली. त्यावेळी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरच्या वेगाने फिरणाऱ्या पंख्याखाली होते. हा पंखा मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला लागण्याची शक्यता अधिक होती. मात्र तिथे उपस्थित वरिष्ठ सुरक्षा रक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला घेतल्याने ते थोडक्यात बचावले.
घाटकोपरच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू
घाटकोपरमध्ये अपघात झालेलं विमान उत्तर प्रदेश सरकारचं होतं. मात्र या विमानाला अलाहाबादमध्ये अपघात झाला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने हे विमान मुंबईतील यूवाय एव्हिएशनला विकलं होतं. या कंपनीने अलाहाबादमधील अपघातामुळे विमानाला झालेला बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर हे विमान उड्डाणासाठी पूर्णत: सज्ज आहे का हे तपासण्यासाठी आजची चाचणी घेण्यात येत होती.
या विमानात पायलट आणि 3 तंत्रज्ञ असे एकूण चार जण होते. यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता. या चौघांचा आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
पायलट मारिया कुबेर, को पायलट प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी, मनीष पांडे यांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही या अपघातात दुर्दैवी अंत झाला.
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्री पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले
हजारोंचे प्राण वाचवले, महिला वैमानिकाने प्रसंगावधान दाखवलं
जुहूवरुन उड्डाण ते घाटकोपरमध्ये विमान कोसळलं, नेमकं काय घडलं?