मुंबई :  शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी घाटकोपर- मानखुर्द लिंक उड्डाणपुलाला (Ghatkopar Mankhurd Link Road flyover)  गरीब नवाज ख्वाजा याचं नाव देण्याची मागणी केली होती.  त्या मागणीवरून शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. खासदार राहुल शेवाळे यांनी आज या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.  लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेच्या विविध प्रकारच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविणे, हे माझे कर्तव्य आहे. घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या नामकरणाबाबतही तिथल्या स्थानिकांची मागणी केवळ सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम मी केले, असं खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी म्हटलं आहे. 


घाटकोपर-मानखूर्द रोडवरील फ्लायओव्हरला ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचं नाव द्या : खा. राहुल शेवाळे


शेवाळे म्हणाले की, घाटकोपर- मानखुर्द लिंक उड्डाणपुलाला नेमके काय नाव द्यायचे, याचा अंतिम निर्णय मुंबई महानगरपालिकेकडून घेतला जाईल.  सदर उड्डाणपुलाचे,  'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुल' असे नामकरण करण्याची मागणी गेल्या वर्षीच केली होती, असा दावा खासदार मनोज कोटक यांनी केला आहे.  छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असून त्यांच्या नावाला कोणताही विरोध करण्याचा प्रश्नच नाही. खासदार कोटक यांच्या मागणीबाबत याआधीच मला माहिती असती, तर नव्या नावाचा प्रस्ताव पुढे आलाच नसता. तसेच स्थानिक नगरसेवक विठ्ठलजी लोकरे यांनी सदर उड्डाणपुलाचे नाव 'वीर क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे' यांचे नाव द्यावे, अशी मागणी यापूर्वीच केलेली आहे. याशिवाय काही लोकप्रतिनिधींनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव सदर उड्डाणपुलासाठी सुचवले आहे, असं शेवाळे म्हणाले.


शेवाळे यांनी म्हटलं आहे की, यापैकी कोणाचाही प्रस्ताव माझ्याकडे न आल्याने मला याबाबत माहिती नव्हती. या सर्व महापुरुषांविषयी मला नितांत आदर आहे. मात्र, केवळ स्वार्थासाठी या साऱ्या प्रकरणाबाबत गैरसमज निर्माण करून, याला धार्मिक रंग देऊन अतिशय हीन राजकारण करण्याचा प्रयत्न काही राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते करत आहेत, ही खेदाची बाब आहे.  या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन समाजात असंतोषाचे वातावरण तयार करणाऱ्यांना माझा इशारा आहे की जनता तुमच्या या स्वार्थी राजकारणाला बळी पडणार नाही, असं ते म्हणाले.