मुंबई : मुंबईत कोरोनाचा (Coronavirus) शिरकाव झाला आणि पाहता पाहता संपूर्ण मायानगरी आणि उपनगरंही याच विषाणूच्या विळख्यात आली. यामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याचं प्रमाण (Dharavi) धारावी झोपडपट्टी या भागात पाहायला मिळाल्यामुळं हा परिसर कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला.


धडकी भरेल अशीच कोरोना रुग्णसंख्या धारावीमध्ये पाहायला मिळाली होती. पण, पालिका कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था अशा कोविड योद्ध्यांच्या योगदानानं आणि अर्थातच नागरिकांच्या सहकार्यानं धारावीनं कोरोनाशी लढा दिला आणि खऱ्या अर्थानं बऱ्याच अंशी हा लढा यशस्वीही ठरला.


सोमवारी (14 जून) आलेल्या नव्या आकडेवारीनुसार धारावीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांमध्ये लक्षवेधी प्रमाणात कमी झाली आहेत.  मागील 24 तासांत आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या या परिसरात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. कोरोनाचा नवा एकही रुग्ण न आढळणं ही एक मोठी दिलासादायक बातमीच आहे. तब्बल चार महिन्यानंतर पहिल्यांदा धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. 


आतापर्यंत सातव्यांदा धारावी शून्यावर


कोरोनाची पहिली लाट



  • 25 डिसेंबर

  • 22 जानेवारी

  • 26 जानेवारी

  • 27 जानेवारी

  • 31 जानेवारी

  • 2 फेब्रुवारी


 कोरोनाची दुसरी लाट 



  • 14 जून


धारावीची कोरोना मुक्तीच्या दिशेनं होणारी ही वाटचाल अनेक ठिकाणी धारावी मॉडेल नावानं कोरोना विळख्यापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शकही ठरली. धारावीमध्ये आतापर्यंत  6861 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दादरमध्ये 9557 तर माहिममध्ये 9876 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.


काल  मुंबईतील कोरोनाचा आकडा एक हजारच्या खाली आला आहे.  मुंबईत काल  700 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 704 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6, 83, 382 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील  एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 15, 773 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर  653 दिवसांवर पोहोचला आहे.