मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात 13 मे रोजी एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग (Ghatkoper Hoarding Collapse) कोसळून झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला होता. संबंधित होर्डिंग हे अनधिकृत असल्याची माहिती समोर आली असून ते इगो मिडीया प्रा.लिमिटेडच्या मालकीचे होते. भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) हा या कंपनीचा मालक होता. होर्डिंग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर पोलिसांनी लगेच भावेश भिंडे यांचा शोध सुरु केला होता. मात्र, आपल्याला अटक होणार, याची कुणकुण लागताच भावेश भिंडे हा मुंबईतून फरार झाला होता. त्यानंतर भावेश जवळपास तीन दिवस पोलिसांना गुंगारा देत पळत होता.
तीन दिवसांत नेमकं काय काय घडलं?
भावेश भिंडेला घाटकोपरमधील दुर्घटनेची माहिती कळताच तो स्वतःच्या ड्रायव्हरला घेऊन मुंबईतून बाहेर पळाला. यानंतर तो लोणावळ्यात एका खासगी बंगल्यात काही तासांसाठी थांबला होता. पोलीस आपल्या मागावर आहेत, याचा भावेशला अंदाज होता. त्याने ड्रायव्हरला नवीन सीमकार्ड आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवले आणि तासाभराने भिंडे एकटाच लोणावळ्याच्या बंगल्यातून निघून गेला. लोणावळ्यातून भिंडे अहमदाबादला एका नातेवाईकाच्या घरी मुक्कामाला थांबला. त्यानंतर भावेश भिंडे उदयपूरमध्ये गेला.
उदयपूरमध्ये एका हॉटेलमध्ये भावेश भिंडे याने स्वतःच्या भाच्याच्या नावाने रूम बुक केली होती तिथे तो लपला होता.भिंडेला याच हॉटेलमधून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. गुन्हे शाखेची सहा ते सात पथकं राजस्थान, जयपूर, अहमदाबाद आणि लोणावळा परिसरात त्याचा शोध घेत होती. अखेर मुंबई पोलिसांनी उदयपूरच्या हॉटेलमध्ये भावेश भिंडेला पकडले. सध्या त्याला मुंबईत आणण्यात आले असून थोड्याचवेळात त्याला विक्रोळी न्यायालयात हजर केले जाणार आहे. घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर दुर्घटना प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
घाटकोपरचा आरोपी कुठल्याही बिळात लपला तरी शोधून काढीन, हे तेव्हाच सांगितले होते. आज त्याच्या मुसक्या आवळल्या.
या होर्डिंगच्या सर्व परवानग्या उद्धव ठाकरेंच्या काळात बेकायदेशीरपणे देण्यात आल्या. हा केवळ अपघात नाही, तर उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळातील आशिर्वादाने केलेला हा खून आहे. लोकांचे जीवन उद्धव ठाकरेंना स्वस्त वाटत असेल, आम्हाला वाटत नाही. आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आणखी वाचा
कानून के हात बहुत लंबे होते है... घाटकोपर बॅनर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भिंडेला राजस्थानमधून अटक